Assembly elections | व्याह्यासह विहिणबाईंही 'विधानसभेत'; 'या' दोघांनी मारले 'मैदान'

0

रमेश बोरनारे व अनुराधा चव्हाणांची बाजी 


 नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत व्याह्यासह विहिणबाईंनीही मैदान मारले. नुसतेच मैदान मारले नाही तर दोघांनीही अख्ख्या मराठवाड्यात नेत्रदीपक विजय मिळवला. वैजापूरचे शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे ( Shivsena MLA Ramesh Bornare) व फुलंब्रीच्या भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाण ( BJP MLA Anuradha Chavhan) हे दोघे नात्याने व्याही व विहिण आहेत. या दोघांनीही निवडणुकीत नेत्रदीपक विजय मिळवला दोघांनीही अनुक्रमे १ लाख ३३ हजार ६२७ व १ लाख ३४ हजार ०६५ मते घेऊन बाजी मारली.

राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात येऊन २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आले. वैजापूर विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे व फुलंब्री मतदारसंघात बोरनारे यांच्या विहिणबाई व भाजपच्या अनुराधा चव्हाण या निवडणुकीत आखाड्यात होत्या. बोरनारे यांची मुलगी ऐश्वर्या ही चव्हाण यांचे पुतणे युवराज चव्हाण यांची पत्नी आहे तर अनुराधा चव्हाण यांची सूनबाई आहे. बोरनारे वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील तर चव्हाण या फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी आहेत.


 साधारणतः तीन वर्षांपूर्वी हा विवाह झाला होता. यापूर्वी बोरनारे यांनी शिवसेनेच्या शहरप्रमुख पदापासून ते, तालुकाप्रमुख , चिंचडगावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य अशा विविध पदांवर तर अनुराधा चव्हाण यांनी जिल्हा परिषद सदस्य पदावर यापूर्वी काम केलेले आहे.  याशिवाय फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्या सभापती देखील आहेत. बोरनारेंनी सन २०१९ मध्ये शिवसेनेकडून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवून ते विजयी झाले होते. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बोरनारे व चव्हाण हे दोघेही आपापल्या मतदारसंघातून रिंगणात होते. 


या दोघांनी या निवडणुकीत मिळविलेला विजय नेत्रदीपक आहे. या निवडणुकीत बोरनारेंनी १ लाख ३३ हजार ६२७ तर चव्हाण यांनी १ लाख ३४ हजार ०६५ मते मिळवून ते दोघे सोबतच विधानसभेत गेले. बोरनारेंनी शिवसेनेचे माजी आमदार स्व. आर. एम. वाणी यांचे 'बोट' धरून राजकारणाचा श्रीगणेशा केला तर चव्हाण यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडेंचा वारसा चालू ठेवला. दोघांचीही राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने सन २०१७ पासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून सुरू झाली. याचवेळी चव्हाण या देखील जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. तेव्हाही ते दोघेही सोबतच जिल्हा परिषदेत निवडून गेले.


 योगायोगाने ते आताही त्या दोघांनी विधानसभेत सोबतच पाऊल टाकले. या दोघांचेही राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी शिंदेसेना व भाजप महायुतीतील मित्रपक्ष आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून महायुती सत्तेत आहे आणि आताही पुन्हा याच महायुतीतील मित्रपक्षातील पक्षांच्या नेत्यांच्या शपथविधीची तयारी सुरू आहे. दरम्यान वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे व फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण या व्याही - विहिनबाईंनी एकाचवेळी सोबत मैदान मारून विधानसभा गाठल्याने जिल्ह्यातील मतदारांच्या भुवया उंचावल्या आहेत.


तेथेच जुळल्या 'रेशीमगाठी'

सन २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत रमेश बोरनारे व अनुराधा चव्हाण निवडून गेल्यानंतर दोघांचीही ओळख झाली अन् नातेसंबंध जुळले. त्यानंतर बोरनारे यांची मुलगी ऐश्वर्या व चव्हाण यांचे पुतणे युवराज चव्हाण यांच्या 'रेशीमगाठी' जुळून नंतर गृहप्रवेश झाला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top