Vaijapur Assembly Election 2024 | तब्बल ४० वर्षांनंतर 'ह्यांच्या'विना होतेय निवडणूक.! यावेळी उमेदवारच नाही

0


वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा इतिहास पाहता गेल्या ४० वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत चिकटगावकर कुटुंबातील कुणी ना कुणी उमेदवार असायचाच. परंतु यंदाची ही पहिलीच अशी निवडणूक असणार आहे की, यात चिकटगावकर दिसणार नाहीत. ४० वर्षांत ही पहिलीच घटना आहे.


वैजापूर तालुक्याच्या राजकारणात चिकटगावकर मोठे प्रस्थ राहिलेले आहेत. याच कुटुंबातून स्व. कैलास पाटील चिकटगावकर (kailas Patil Chikatgaonkar) हे सन १९८५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आय काॅंग्रेसचे पहिल्यांदाच उमेदवार म्हणून उभे होते. १९९० मध्येही ते अपक्ष उमेदवार होते. या दोन्हीही निवडणुकीत ते पराभूत झाले होते. या सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत एस. काॅंग्रेसचे रामकृष्णबाबा पाटील यांनी बाजी मारली होती. परंतु खचून न जाता १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकीत आय काॅंग्रेसचे कैलास पाटील चिकटगावकर पुन्हा एकदा आखाड्यात उतरले अन् त्यांनी 'आमदारकी'ची विजयी पताका रोवली.


 त्यानंतर १९९९ मध्ये ते शिवसेनेच्या स्व. आर. एम. वाणी यांच्याकडून ते पराभूत झाले. २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काॅंग्रेसचे भाऊसाहेब ठोंबरे यांना उमेदवारी मिळाली होती. काॅंग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असल्यामुळे थोरल्या चिकटगावकरांनी 'विश्रांती' घेऊन आघाडीच्या उमेदवाराचे काम करणे पसंत केले. परंतु असे असले तरी त्यांचे धाकटे बंधू भाऊसाहेब पाटील चिकटगावकर ( Bhausaheb Patil Chikatgaonkar) यांनी या निवडणुकीत अपक्ष म्हणून शड्डू ठोकून उतरले होते. येथूनच थोरल्या व धाकट्या चिकटगावकरांमधील 'भाऊबंदकी' चव्हाट्यावर येऊन संघर्ष विकोपाला पोहोचला.


 वैजापूर तालुक्याचे नेतृत्व कुणी करायचे? या कारणावरून हा वाद पेटला होता. हा वाद एवढा विकोपाला गेला की, सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत थोरले व धाकटे चिकटगावकर दोघेही अपक्ष उमेदवार म्हणून एकमेकांसमोर आमनेसामने उभे ठाकले. परिणामी दोघेही पराभूत होऊन यात शिवसेनेचे आर. एम. वाणी ( R M Wani) यांची तिसऱ्यांदा 'लाॅटरी' लागली. गेल्या काही निवडणुकांतील आलेले अपयश पाहता सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्हीही चिकटगावकर एकत्र आले अन् त्यांनी आर. एम. वाणींना शह देऊन 'चीत' करीत त्यांची विजयी श्रृंखला खंडित केली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर विजयी झाले. 


थोरल्या चिकटगावकरांच्या निधनानंतर सन २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भावाची परतफेड म्हणून धाकट्या भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांनी 'ब्रेक' घेत कैलास पाटील चिकटगावकर यांचे पुत्र अभय पाटील चिकटगावकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मैदानात उतरविले. या काळातही काही दिवस काका - पुण्यामध्ये सुंदोपसुंदीचे वातावरण होते. परंतु भाऊसाहेब चिकटगावकरांनी समजदारीची भूमिका घेत माघार घेतली. या निवडणुकीत अभय चिकटगावकरांचा ( Abhay Patil Chikatgaonkar) पराभव झाला होता. शिवसेनेचे रमेश बोरनारे यांनी त्यांना पराभूत केले होते.


असे प्रथमच घडले

एकंदरीतच सन १९८५ पासून ते २०१९ पर्यंत झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत चिकटगावकर कुटुंबातील कुणी ना कुणी उमेदवार होताच. परंतु ४० वर्षांनंतर या निवडणुकीत चिकटगावकर कुटुंबातील कुणीच उमेदवार नाही. एवढ्या वर्षांच्या निवडणुकीच्या इतिहासात असे प्रथम घडले आहे.


चिकटगावकर अन् निवडणूक आखाडा !

कैलास पाटील चिकटगावकर यांनी पाच विधानसभा निवडणुका लढविल्या. त्यांचे धाकटे बंधू भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे तीनवेळा मैदानात होते. कैलास पाटील यांचे पुत्र व भाऊसाहेब पाटील यांचे पुतणे अभय पाटील चिकटगावकर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकदाच उमेदवार होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top