वैजापूरच्या सभेत हल्लाबोल
सध्याचे सरकार हे नतद्रष्टांचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या फसव्या घोषणा व वल्गनांमुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. महाविकास आघाडीच्या हातात सत्ता द्या. मी ठामपणे सांगतो की, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मी हमीभाव देऊन दाखवितो. सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांची लगेचच कर्जमाफी करतो. अशी ग्वाही देऊन 'लुटेंगे तो बाटेंगे' हाच भाजपचा नारा असल्याची खोचक टीका उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( UBT Shivsena Leader Uddhav Thackeray) यांनी वैजापूर येथे दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या ( मुलांची ) मैदानावर उबाठा महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ. दिनेश परदेशी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, काॅंग्रेस नेते भाऊसाहेब ठोंबरे, अप्पासाहेब पाटील, काकासाहेब पाटील, शिल्पा परदेशी, बाळासाहेब संचेती, पंकज ठोंबरे, सुमन वाणी, शेख अकिल, आसाराम रोठे, प्रकाश चव्हाण, अविनाश गलांडे, मंजाहरी गाढे, सचिन वाणी, संकेत वाणी, विठ्ठल डमाळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
ठाकरे आपल्या तडाखेबंद भाषणात म्हणाले की, शेतीमालाला हमीभाव नाही. महागाई गगनाला भिडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप उमेदवारांचा प्रचार करतात. त्यांनी पदाचा राजीनामा देऊन प्रचार करायला हवा होता. ते देशाचे पंतप्रधान आहेत, भाजपचे नव्हे. अटल बिहारी वाजपेयींचा भाजप आता राहिला नाही. त्यांच्यात माणुसकी होती. भाजपचे आताचे नेतृत्व अप्पलपोटे आहे. शिवसेनेमुळेच राज्यात भाजप स्थिरस्थावर झाला.
शिवसेनाप्रमुखांनी एकनाथ शिंदेंना दोनदा मंत्री केले. परंतु त्यांनी उपकाराची परतफेड गद्दारी करून केली.खोके घेऊन ते विकले गेले. ते राज्याचा काय विकास करतील? असा प्रश्न उपस्थित करून 'बाटेंगे तो कटेंगे' हा भाजपचा नारा सुरू आहे. परंतु परिस्थिती वेगळी आहे. 'लुटेंगे तो बाटेंगा' असाच नारा भाजपचा आहे. काश्मीरमध्ये कलम ३७० कलम हटविले. त्यामुळे कापूस, सोयाबीन व अन्य शेतमालाला हमीभावाची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करून काश्मीरला मुफ्ती मोहंमद सईदा सोबत जाऊन बसतात तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? त्यामुळे भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये.
मोदी आमच्या पक्षाचा रिमोट हाती घेऊ शकले नाही तर मी काँग्रेसच्या हाती रिमोट कसा देणार ? राज्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्र लुटून गुजरातला नेत आहे. पूर्ण महाराष्ट्र माझे कुटुंब असून या कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी डॉ. परदेशींसारख्यांना विधानसभेत पाठवून मलाही हातभार लावा. असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले. डॉ. परदेशींनी आमदार बोरनारेंवर खरपूस टीका करून झालेल्या विकासकामांतील गैरव्यवहाराचा पाढाच वाचला. 'रामकृष्ण' जलसिंचन योजनेची कर्जमाफी असो की अन्य कामे केवळ कागदोपत्री झाल्याचे म्हटले आहे. यावेळी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधानांचीही बॅग तपासली पाहिजे
गेल्या काही दिवसांपूर्वी मी सभेच्या निमित्ताने गेलो असता, माझी बॅग तपासली गेली. हरकत नाही. नियम व कायदा सारखा असला पाहिजे. या न्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही बॅग तपासली पाहिजे. परंतु तसे होत नाही. आज माझी बॅग तपासली नाही. नशीब माझे. असा खोचक टोलाही ठाकरेंनी लगावला.