वैजापूर न्यायालयाचा निकाल
शेतीच्या वादातून विळ्याने सपासप वार करून सावत्र आईचा खून करणाऱ्या वैजापूर तालुक्यातील अगरसायगाव येथील आरोपीस जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
नानासाहेब घमाजी जाधव (रा.अगरसायगाव, ता. वैजापूर) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील मयत आशाबाई घमाजी जाधव (५५) या अगरसायगाव शिवारात शेत गट क्रमांक ८५ मध्ये रहिवासास होत्या. ०१ जुलै २०२३ रोजी दुपारच्या सुमारास त्यांचा सावत्र मुलगा नानासाहेब जाधव हा शेतवस्तीवर आला. ' मला तुमच्याकडील अर्धा एकर शेतजमीन द्या' असे म्हणून त्याने आशाबाई यांच्यावर धारदार विळ्याने सपासप वार केले. या हल्ल्यात त्या ठार झाल्या. ही घटना ०१ जूलै २०२३ रोजी घडली होती. याप्रकरणी त्यांचा मुलगा अक्षय घमाजी जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात नानासाहेब जाधव याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान गुन्ह्याचा तपास करून तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्या दरम्यान सरकारी वकील अॅड नानासाहेब जगताप यांनी एकूण नऊ साक्षीदार तपासले. यापैकी तिघांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्हीही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेऊन न्यायाधीश एस. के. उपाध्याय यांनी आरोपी नानासाहेब जाधव यास कलम ३०२ भादवी अन्वये जन्मठेपेची शिक्षा, तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या सक्षम कारवासाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अँड नानासाहेब जगताप यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून गायकवाड व सागर विघे यांनी त्यांना सहकार्य केले.
छाया स्त्रोत - गुगल