Government Hostel | संतापजनक: पोह्यासह जेवणात चक्क किडे; 'या' वसतिगृहातील प्रकार, मुलींनीच केली 'पोलखोल'

0

सहायक आयुक्तांची भेट


 रात्रीच्या जेवणासह नाश्त्यात किडे आढळून आल्याचा संतापजनक प्रकार १० आॅक्टोबर रोजी वैजापूर शहरानजीकच्या समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर मुलींना सडक्या सफरचंदासह केळी दिली जात असल्याच्याही तक्रारी करण्यात आल्या. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलींनी थेट तहसीलदारांना गाठून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे साकडे घातले. या प्रकारानंतर समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी वसतिगृह गाठून संबंधितांविरुद्ध कारवाईचे संकेत दिले.



वैजापूर शहरातील शिवराई रस्त्यावर गायकवाडवाडी परिसरात शासनाच्या समाजकल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. हे वसतिगृह या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. निकृष्ट दर्जाचे जेवण, नाश्ता ही कायमचीच बाब झाली आहे. या वसतिगृहात ५१ मुली वास्तव्यास असून ९ आॅक्टोबर रोजी रात्री मुलींना देण्यात आलेल्या भाजीत किडे आढळून आले. हाच प्रकार दुसऱ्या दिवशीही झाला. १० आॅक्टोबर रोजी सकाळी मुलींना दिलेल्या नाश्त्यातील पोह्यात किडे आढळून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या आठ ते दहा मुलींनी थेट तहसीलदार सुनील सावंत यांच्याकडे जाऊन तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुलींनी सावंत यांची भेट घेऊन आपबिती सांगितली. त्यानंतर सावंत यांनी समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकरणाचा छडा लावण्याचे फर्मान सोडले. मुलींनी वसतिगृहाच्या गलथान कारभाराचा पाढाचा तहसीलदारांसमोर वाचला.

निकृष्ट नाश्त्यासह जेवण ही नित्याचीच बाब झाली असून फळेही सडलेली दिली जातात. याबाबत मुलींनी छायाचित्रेच सावंत यांना दाखविली. याशिवाय सकाळचा नाश्ता पूर्णपणे न अर्धवट दिला जातो. याबाबत आम्ही वारंवार ओरड, तक्रारी करूनही काही उपयोग होत नाही. समाजकल्याण विभागाचेही अधिकारीही या बाबीची दखल घेत नाही.  हा प्रकार पहिल्यांदाचा झाला असे नाही. दखल घ्यायलाच कुणी तयार नाही. मग दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न उपस्थित करून आता तुम्हीच हा प्रश्न मार्गी लावा. असे साकडे मुलींनी सावंत यांना घातले. दरम्यान या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रमोद भोगले यांनी वसतिगृहास भेट मुलींशी संवाद साधून तक्रारी जाणून घेतल्या. 

गृहपाल काय म्हणतात?

नाश्त्यासह जेवणाबाबत मुलींच्या कायमच तक्रारी असतात. २ आॅक्टोबर रोजीही मुलींनी माझ्याकडे तक्रारी केल्या होत्या. अशी कबुली वसतिगृहाच्या गृहपाल शर्मिला निकाळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. परंतु माझ्याकडे छत्रपती संभाजीनगर येथील अतिरिक्त पदभार असल्यामुळे पाहिजे तसा वेळ देता येत नाही.


आयुक्त म्हणतात डाटा नाही

दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर सहायक आयुक्त प्रमोद भोगले यांनी वसतिगृहास भेट दिली असता या वसतिगृहातील जेवणासह अन्य विविध तक्रारी असल्याच्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी 'मी नवीन रुजू झालो आहे. त्यामुळे माझ्याकडे डाटा नाही'. असे सांगून वेळ मारून नेली. ते जर तक्रारीच्या अनुषंगाने येथे आले असेल तर त्यांनी सहकाऱ्यांकडून या वसतिगृहाचा 'इतिहास' जाणून घेणे आवश्यक होते. त्यामुळे ते औपचारिकता म्हणून येथे आले होते की काय? असाही प्रश्न उपस्थित होतो.


मुलींच्या तक्रारीच्या अनुषंगाने मी वैजापूर येथे आलो होतो. त्यांच्याशी संवाद साधून सत्यता पडताळून घेतली. त्यांच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य आहे. याबाबत संबंधित ठेकेदारास सुधारणा करण्याची सूचना दिली आहे अन्यथा कारवाई अटळ आहे.

- प्रमोद भोगले, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top