मतदारांचा सवाल
नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होईल. असे गृहीत धरून स्थानिक शिंदेसेनेसह ठाकरेसेना, भाजप व अन्य नेतेमंडळी कामाला लागली आहे. निवडणुकीला अजून यथावकाश असला तरी आतापासूनच मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. शिंदेसेनेच्या आमदारांसह ठाकरेसेनेकडून मतदारसंघात उमेदवार निश्चित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपसह अन्य इच्छुक नेत्यांचे काय? असा प्रश्न आपसूकच मतदारांना पडला आहे.
गेल्या महिनाभरापासून तालुक्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर राजकीय 'त्सुनामी' सुरू आहे. या त्सुनामीत काही नेत्यांना पक्षातून 'एक्झिट' घ्यावी लागली तर काहींना 'इन' होण्याची संधी मिळाली. काही हौसे, नवसे, गौसे पक्षात असूनही केवळ आघाडी, महायुतीमुळे त्यांच्या उमेदवारीचे 'वांधे' होणार आहे. निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांची संख्या कमी नाही. यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
ठाकरेसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर ( तात्या) यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केल्यानंतर भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी ( भाऊ) यांच्या ठाकरेसेनेतील प्रवेशाची चर्चा सुरू झाली. अखेर हा 'राज्याभिषेक' होऊन त्याचे 'कवित्व' आता संपले आहे. त्यांची उमेदवारीही निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे शिंदेसेनेचे 'सर'सेनापती आमदार रमेश बोरनारे (सर) यांच्याही उमेदवारीवर शिक्कामोर्तब आहेच. परंतु ठाकरेसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या चिकटगावकरांचा ऐन निवडणुकीच्या तोंडावर 'टिळा' लावण्यासाठी पक्षाचा शोध सुरू आहे. डॉ. परदेशींच्या पक्ष प्रवेशानंतर वैजापूर तालुक्यात आता 'आकडेमोड' सुरू झाली आहे. जातीय समीकरणांसह पक्ष, नातीगोती आदी हिशेब समोर ठेवून हा आकड्यांचा खेळ मांडला जात आहे. याशिवाय 'बंडोबां'सह हौसे, नवशांनाही गृहीत धरून त्यांची मते मोजली जात आहे. बोरनारे, चिकटगावकर व परदेशी हे तिघेही तसे तुल्यबळ व एकाचढ एक आहे. यापैकी दोघांकडे अनुक्रमे 'धनुष्यबाण' व 'मशाल' आहे तर चिकटगावकरांकडे त्यांच्या म्हणण्यानुसार 'तुतारी'चा पर्याय होऊ शकतो. परंतु ते आजतरी निश्चित नसल्यामुळे उमेदवारीचेही 'तळ्यात - मळ्यात' आहे. त्यांनी अंदाज वर्तविला खरा. परंतु शरद पवार व उध्दव ठाकरेंच्या वाटाघाटीत ही जागा सुटणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
गेल्यावेळी येथील जागेवर ( अखंड ) शिवसेनेने बाजी मारली होती. त्यामुळे आताही ठाकरेसेना या जागेवरून दावा सोडणार नाही. त्यामुळे ही जागा ठाकरे सेनेच्या पारड्यात जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळेच परदेशींनी चिकटगावकरांना 'ओव्हरटेक' करून ठाकरेंची 'मशाल' हाताशी करून घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून 'ब्रेकर' ठरलेल्या परदेशींच्या ठाकरेसेनेतील प्रवेशामुळे भाजपच्या एकनाथ जाधवांना 'कमळ' फुलविण्याचे वेध लागले आहेत. परंतु महायुती धर्मामुळे त्यांचीही चांगलीच गोची झाली आहे. त्यामुळे ऐनवेळी त्यांचा काय निर्णय राहील. हे आज सांगणे कठीण आहे. एकंदरीतच बोरनारेंकडे 'धनुष्यबाण', परदेशींकडे 'मशाल' मग चिकटगावकरांकडे काय? असा प्रश्न आपसूकच मतदारांना पडला आहे.
इनसाईड स्टोरीचा 'सस्पेन्स' कायम!
डॉ. परदेशींचा पक्षप्रवेश झाल्याने अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. परंतु प्रवेशाच्या सुरू झालेल्या चर्चेपासून ते दरम्यानच्या काळात मिळालेला 'स्वल्पविराम' व पुन्हा दहा दिवसांतच झालेल्या प्रवेशाची इनसाईड स्टोरीचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. चर्चा काही असो. परंतु खरा खुलासा अजूनही झालेला नाही. वेळ आल्यानंतर याचा सविस्तर 'उलगडा' करण्याचे सुतोवाच परदेशींनी केले.