Vaijapur Assembly Election 2024 | माजी आमदारांचा आज 'निर्धार'; भाजप नेत्याचे बंडाचे निशाण.! राजकीय हालचालींना वेग

0

इच्छुकांची चलबिचल


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या असून कोणत्याही पक्षांकडून उमेदवारी पदरात पडत नसल्याने इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. मित्रपक्षातील शिंदेसेनेच्या आमदारास उमेदवारी दिल्याने भाजपचा नेता बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत तर दुसरीकडे ठाकरसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या माजी आमदारांना पक्ष रुपाने भाळी 'टिळा' लावण्यासाठी पक्षाचा जम बसत नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत आज ते आपली भूमिका स्पष्ट करून 'निर्धार' करणार आहे.


शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांना पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकीचे डोहाळे लागलेल्या भाजपचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य एकनाथ जाधव बंडाच्या पवित्र्यात आहेत. त्यांनी २४ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधवांनी नशीब आजमावले होते. त्यांनी २५ हजार मते मिळविली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांनी बाजी मारली होती. 


सन २०१९ मध्ये शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या समवेत जाधवांनी काम केले होते. परंतु यंदा जाधवांची राजकीय महत्त्वाकांक्षा उफाळून आल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून ते 'एकला चलो रे' च्या पवित्र्यात दिसताहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला खरा. परंतु ते निवडणूक आखाड्यात राहतात की माघार घेतात? हे मात्र ४ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. 


दुसरीकडे ठाकरेसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांची भूमिका आतापर्यंत तळ्यात - मळ्यात दिसून आली. २६ आॅक्टोबर रोजी कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील वाटचाल ठरविणार असल्याचे समजते. राजकीय मतभेद असलेल्या पुतणे अभय पाटील चिकटगावकर यांनाही त्यांनी सोबत  घेण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षातून बाहेर पडल्यानंतर चिकटगावकर काहीअंशी बॅकफूटवर फेकले गेले. मनोज जरांगेंकडूनही त्यांचे उमेदवारीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु असे असले तरी आज होणाऱ्या निर्धार बैठकीत चिकटगावकर सर्वांच्याच भुवया उंचायला लावणारा निर्णय घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. त्यामुळे चिकटगावकर आज काय भूमिका घेतात? याबाबत मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top