Panchayat Samiti | आता 'खादाड' पर्यवेक्षिकांवर 'जाळे' टाका; 'या' कार्यालयाची खाबूगिरी चव्हाट्यावर

0

प्रकल्प अधिकाऱ्याचे लाचप्रकरण 


वैजापूर येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयातर्गंत कार्यरत असलेल्या लाचखोर अधिकाऱ्यासह शिपायाच्या खाबूगिरीने या कार्यालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. प्रकल्प अधिकारी व शिपाई लाचखोरीत अडकले खरे. परंतु या कार्यालयातील ख-या अर्थाने खाबूगिरी करणारे कर्मचारी व पर्यवेक्षिका अजून शाबूत आहेत. त्यामुळे सेविकांनी त्यांनाही जाळे टाकण्याची आवश्यकता आहे. 



येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाने खाबूगिरीचा कळस गाठला असून या कार्यालयातर्गंत कार्यरत असलेल्या काही अधिकाऱ्यांसह पर्यवेक्षिका खुलेआमपणे अंगणवाडी सेविकांची लूट करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका अर्थिक शोषण सहन करीत आहेत. लाचखोर भ्रष्ट अधिकारी व पर्यवेक्षिका आपले कुणीच काही वाकडे करीत नाही. अशा आविर्भावात राहून त्यांचे हे शोषण सुरूच आहे. कार्यालयप्रमुखांसह कर्मचारी व  सर्वच अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षिका पैशांची मागणी करीत ओरड नेहमीच होते. ४ आॅक्टोबर रोजी बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल चव्हाण व शिपाई अनंता बुट्टे या दोघांना कार्यालयातच तिघा अंगणवाडी सेविकांच्या पतीकडून ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्यामुळे आता या कार्यालयात ' एम' व्हिटॅमिन किती मोठ्या प्रमाणावर चालते. याबाबत आता शिक्कामोर्तब झाले आहे.  येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयातील कारभार ढेपाळला असून कार्यालयप्रमुखच अंगणवाडी सेविका भरती व पदोन्नतीसाठी पैसे घेतात. हे मात्र जगजाहीर झाले आहे. वेगवेगळ्या कामांसाठी  पर्यवेक्षिका पैशांची सर्रासपणे मागणी करीत असल्याच्या तक्रारीही काही सेविकांच्या आहेत. अंगणवाड्यांच्या पोषण आहारापासून ते छोट्या - मोठ्या बाबींची देयके काढण्यासाठी कार्यालयातील अधिकारी , कर्मचारी व पर्यवेक्षिका संचिकेवर 'वजन' ठेवल्याशिवाय देयके काढीत नसल्याचा आरोप सेविकांकडून सातत्याने होत आहे. त्यामुळे या कार्यालयाने खाबूगिरीचा किती कळस गाठला. याची प्रचिती येते.. कार्यालयप्रमुखांसह कर्मचारी व पर्यवेक्षिकांना गलेलठ्ठ वेतन असतांना अंगणवाडी सेविकांचे त्यांच्याकडून अर्थिक शोषण केले जाते. ही बाब गंभीर म्हणावी लागेल. अंगणवाडी सेविका तुटपुंज्या मानधनावर काम करीत असतांना त्यांची अर्थिक पिळवणूक करणे कितपत योग्य आहे. गेल्या काही दिवसांपासून एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे. पोषण आहाराचे देयके काढण्यासाठी सर्रासपणे पैशांची मागणी केली जाते. पर्यवेक्षिका जर पैशांची मागणी करीत असेल तर कार्यालयप्रमुख केवळ बघ्याची भूमिका का घेतात?  ते बघ्याची भूमिका घेत असेल तर यात कार्यालयप्रमुखांचाही वाटा असतो का? असा अर्थ यातून काढायचा का?तक्रारी करूनही त्यांनी आतापर्यंत कारवाई का नाही केली? या लाचखोरीत सर्वांचेच हात बरबटलेले आहे का? तक्रारी करूनही कार्यालयप्रमुख कारवाई करायला धजावत नसेल तर 'अलीबाबा चाळीस चोर' असा अर्थ यातून घ्यायचा का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी एकजूट होऊन लाचखोरीविरुध्द हा लढा असाच सुरू ठेवून खाबूगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी व पर्यवेक्षिकांना जाळे टाकण्याची आवश्यकता आहे. असे झाले तरच खाबूगिरीला काही प्रमाणात लगाम बसेल.


पदभारानंतर लगेचच 'हातकडी

प्रकल्प अधिकारी अनिल चव्हाण याने गेल्या आठवड्यातच नव्याने पदभार स्वीकारला होता. त्याने पदभार स्वीकारल्यानंतर अंगणवाडी सेविकांसह अन्य कर्मचाऱ्यांकडून ते अजून हारतुरे स्वीकारीतच होते. अशा परिस्थितीत अंगणवाडी सेविकेच्या पदोन्नतीसाठी लाच स्वीकारल्याने त्याच्या हातात हातकडी पडली. हा नेमका कोणता योगायोग समजावा? 


'त्या' महिला अधिकाऱ्याला 'सुवर्ण' संधी

अंगणवाडी सेविका भरतीसाठी जिल्हा परिषदेतील एका महिला अधिकाऱ्याचेही नावही सध्या स्थानिक पातळीवर जोरदार चर्चेत आहे. ही महिला अधिकारीही भरतीसाठी गरजू महिलांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेण्याची एकही 'सुवर्ण' संधी सोडत नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाही तिच्या 'प्रतापा'ची कुणकुण लागलेली आहे. परंतु तक्रारीसाठी पुढे येऊन कुणी धजायला तयार नसल्याने त्या महिला अधिकाऱ्याचे सध्या चांगलेच फावत आहे. परंतु ती लवकरच एसीबीच्या जाळ्यात अडकेल. अशी चर्चा स्थानिक पातळीवरील सेविकांमध्ये सुरू आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top