काॅंग्रेसची दीर्घकाळ सत्ता
वैजापूर विधानसभा मतदारसंघावर आतापर्यंत काॅंग्रेसच्या खालोखाल शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. यामध्ये मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान दोन दांपत्यांना मिळाला आहे. त्याखालोखाल एकाच कुटुंबातील दोघा भावांनाही आमदारकीची संधी मिळाली आहे.
सन १९५२ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकीत वैजापूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्या आमदार होण्याचा मान कै. आशाताई वाघमारे यांना मिळाला. त्यांनी सन १९५२ ते १९५७ पर्यंत मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीचे अॅड. मच्छिंद्रनाथ जाधव यांना आमदार होण्याची संधी मिळाली. त्यांनी १९५७ ते १९६२ पर्यंत सत्ता गाजविली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार मच्छिंद्रनाथ जाधव यांच्या सहचारिणी गिरजाबाई जाधव या काँग्रेस पक्षाच्या आमदार झाल्या. त्या १९६२ ते १९६७ आमदार राहिल्या. त्यांच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीनंतर १९६७ मध्ये काँग्रेसचे माजी कै. विनायकराव पाटील यांनी आमदारकीची धुरा सांभाळली. अवघ्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत विनायकराव पाटील या धुरंधर नेत्याने ख-या अर्थाने तालुका नावारूपास आणला.
सहकारमंत्री म्हणून पदाची धुरा सांभाळत असताना त्यांनी तालुक्यातील विनायकनगर ( परसोडा) येथे विनायक सहकारी साखर कारखान्याची उभारणी करून विकासाची मुहूर्तमेढ रोवली. याशिवाय मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून वैजापूरसारख्या ग्रामीण भागात शाळा व महाविद्यालयाचा श्रीगणेशा केला. तालुक्यातील डोंगरथडी भागातील मन्याड साठवण तलाव हा देखील त्यांचीच देणगी म्हणावी लागेल. सन १९६९ मध्ये त्यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचेच कै. गंगाधरनाना पवार विजयी झाले. त्यांच्यानंतर कै. विनायकराव पाटील यांच्या पत्नी शकुंतलाबाई पाटील यांनी पाच वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. मतदारसंघातून जाधव व पाटील या दोन दांपत्यांनाच आमदारकीची संधी मिळाली.
त्याखालोखाल काॅंग्रेसचे माजी आमदार कै. कैलास पाटील चिकटगावकर व त्यांचे धाकटे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर या दोघा बंधूंनीही एकाच कुटुंबातून आमदार होण्याचा मान मिळवला आहे. दोघांनी अनुक्रमे १९९५ ते १९९९ व २०१४ ते २०१९ या कालावधीत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. काॅंग्रेसचे कै. रामकृष्णबाबा पाटील हे सन १९८५ ते १९९५ आमदार राहिले. शिवसेनेचे कै. आर. एम. वाणी यांनी सन १९९९ ते २०१४ पर्यंत आमदारकीची हॅट्ट्रिक केली. परंतु या दोन्हीही कुटुंबातून पुढे आमदारकीचे दावेदार कुणीच होऊ शकले नाही.
२० वर्षांपासून गड शिवसेनेकडे
वैजापूर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता आतापर्यंत काॅंग्रेसचाच वरचष्मा राहिलेला आहे. काॅंग्रेसने आतापर्यंत मतदारसंघाला बहुतांश आमदार दिले. परंतु सन १९९९ पासून काॅंग्रेस पक्षाला उतरती कळा लागून शिवसेनेने ती जागा बळकावली. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार कै. आर. एम. वाणी यांनी आमदारकीची हॅट्ट्रिक केल्यानंतर शिवसेनेचेच आमदार रमेश बोरनारे यांनीही हा गड कायम ठेवला. ते २०१९ पासून ते आजतागायत आमदार आहेत. दरम्यानच्या काळात भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचा पाच वर्षांचा अपवाद वगळता मतदारसंघावर तब्बल २० वर्षांपासून शिवसेनेचेच वर्चस्व आहे.