Godavari River | जलसमाधी: 'ते' चौघे दुचाकीवरून जात होते.. नियंत्रण सुटले अन् थेट बुडाले नदीत.!

0

गोदापात्रात बुडून तिघांचा मृत्यू 


 शेतातील मजुरीचे काम आटोपून दुचाकीवरून घराकडे परतणारे वृद्ध महिलेसह तिघा जणांचा गोदापात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना १२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वैजापूर - श्रीरामपूर तालुक्याला जोडणाऱ्या पुलावर तालुक्यातील शनीदेवगाव हद्दीत घडली. दरम्यान यातील एका जणाला वाचविण्यात यश आले तर रात्री उशिरापर्यंतच्या शोधकार्यांनंतर महिलेचा मृतदेह तर १३ आॅक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास दोघांचे मृतदेह सापडले.



वेणूबाई मनोहर बरडे (७० ) , दिलीप सोमनाथ बरडे (३५ ) व रवी सोमनाथ मोरे (२७) सर्व रा. कमलपूर ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर ( अहमदनगर) अशी तिघा मृतांची नावे आहे तर मच्छिंद्र गोपीनाथ बरडे (२८) रा. कमलपूर हा या घटनेतून वाचला. याबाबत अधिक माहिती अशी की, विजयादशमी सणाच्या दिवशी दिवसभर शेतातील मोलमजुरीची कामे आटोपून आदिवासी समाजातील चार मजूर एकाच दुचाकीवरून सायंकाळच्या सुमारास नदीकाठावरील आपल्या घराकडे निघाले होते. या दोन्ही तालुक्यांना जोडण्यासाठी गोदापात्रावर पुल बांधण्यात आलेला आहे. नदीतच कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आलेला आहे. परंतु पुलाला संरक्षक कठडे नसल्यामुळे येथून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला सामोरे जाण्यासासखा प्रकार आहे.  त्यामुळे शनीदेवगाव - कमलपूर कोल्हापुरी बंधाऱ्यावरून दुचाकी, चारचाकी वाहन चालविणे म्हणजे 'मौत का कुवा' सारखी कसरत असते.

 त्यातच खड्ड्यांमुळे दुचाकीच काय परंतु पायी चालणेही अवघड आहे. अशा परिस्थितीत एकाच दुचाकीवरून तब्बल चौघेजण कमलपूरच्या ‌घराकडे जाण्यासाठी निघाले. परंतु उशीर झाल्याने घाईगडबडीत खड्ड्यांमुळे मोटारसायकलवरील  नियंत्रण सुटले अन् मोटारसायकलसह चौघेजण बंधाऱ्यातील पात्रात  भामाठाणच्या बाजूने पडले. सायंकाळच्या सुमारास बंधाऱ्यावरून  तुरळक  वर्दळ सुरू होती. आरडाओरड झाल्यावर स्थानिक नागरिक मदतीला धावले. श्रीरामपूर हद्दीतील बंधाऱ्यावर पाटबंधारे कर्मचारी  सोमनाथ शिरसाठ जवळच राहतात. ते घटनास्थळी मदतीला धावून आले  या चौघांपैकी मच्छिंद्र गोपीनाथ बरडे (२५) याला वाचविण्यात यश आले.  स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने सुरू झालेल्या मदतीने वेणूबाई मनोहर बरडे (वय ७०) या वृध्द महिलेचा मृतदेह रात्री उशिराने सापडला. मात्र दिलीप सोमनाथ बरडे  व रवी सोमनाथ मोरे या दोघांचे  मृत्तदेह रात्री ११ वाजेपर्यत हाती लागलेले नव्हते. 


दोघांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडले

दरम्यान १३ आॅक्टोबर रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक) पथकासह अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिस यंत्रणा व नागरिकांच्या साह्याने दिलीप बरडे व रवी मोरे या दोघांचे मृतदेह शोधण्यास यश आले. वीरगाव, श्रीरामपूर पोलिसांसह महसूल कर्मचारीही यावेळी उपस्थित होते. हे सर्व आदिवासी कमालपूर गावातील असल्याने ग्रामस्थांसह आदिवासी बांधवांवर शोककळा पसरली आहे.


श्रीरामपूर पोलिसांचे मदतकार्य 

या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निरीक्षक दशरथ चौधरी, टाकळीभान औट ठाण्याचे हवालदार राजेंद्र त्रिभुवन  व बाबा ढवळे तातडीने घटनास्थळी पोहोचले. यावेळी  पाटबंधारे कर्मचारी शिरसाठ यांनी सांगितले की, या बंधाऱ्यात एकूण ५२ मोऱ्या ( दरवाजे) असून ३४ श्रीरामपूर हद्दीत तर १८ वैजापूर तालुक्याच्या हद्दीत आहे. हा अपघात १८ मोऱ्यात घडलेला असल्याने श्रीरामपूर पोलिसांसह शिरसाठ यांनी वीरगाव पोलिस ठाण्यात खबर दिली. वैजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, वीरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे  आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. वीरगाव पोलीस घटनास्थळी जाईपर्यंत श्रीरामपूर पोलिस घटनास्थळी मदतकार्यास सहकार्य करीत होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top