प्रतिष्ठा लावली पणाला
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत पाडायचे की लढायचे? याबाबतचा निर्णय अद्याप बाकी असला तरी मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी वैजापूर तालुक्यातील इच्छुकांचे अर्ज व कार्य अहवाल स्वीकारण्यास सुरवात केली आहे. दरम्यान मतदारसंघात दीड लाखापेक्षा अधिक मराठा मतदार असल्याने जरांगे पॅटर्नला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.माजी आमदारांपासून ते अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत आरक्षणविरोधी पक्षांचे उमेदवार पाडायचे की, मराठा समाजाच्यावतीने उमेदवार उभे करायचे? याबाबत मनोज जरांगे यांचा निर्णय अद्यापही स्पष्ट झालेला नाही. मात्र, सध्या इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने वैजापूर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते. यावेळी झालेल्या या मुलाखतीच्या कार्यक्रमात तालुक्यातील अनेक जणांनी आपापले कार्यअहवाल सादर केले तर काही जणांनी यापूर्वीच अंतरवाली सराटी येथे प्रत्यक्ष जाऊन मनोज जरांगे यांच्याकडे अर्ज सादर केले आहेत. यामध्ये सर्वजातीय बहुतांश पक्षातील उमेदवारांचा समावेश आहे. जरांगे यांच्या माध्यमातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार रविवारी वैजापूरहून अंतरवाली सराटी येथे गेले होते. त्यामुळे यातून जरांगे पॅटर्नसाठी कुणाची लॉटरी लागते. याबाबत राजकीय वर्तुळात सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.
कुणाची लाॅटरी लागणार?
मनोज जरांगेंकडून निवडणूक लढविण्यास बहुतांश उमेदवार इच्छुक आहेत.वैजापूर मतदारसंघातून माजी आमदार भाऊसाहेब पाटिल चिकटगावकर, अप्पासाहेब रामकृष्ण पाटील, भाजपचे अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष नबी पटेल, काॅंग्रेसचे प्रशांत सदाफळ, प्रहारचे जे.के.जाधव, डॉ. राजीव डोंगरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मंजाहरी गाढे यांच्यासह अन्य मतदारसंघातून इच्छुक आहेत.