Manoj Jarange | दसरा मेळावा: 'विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती.!' नेत्यांसह कार्यकर्त्यांसमोर पेच

0

मनोज जरांगेंचा दसरा मेळावा

 

विजयादशमी म्हणजेच दसरा सण आज आहे. सोन्याची ( आपट्यांची पाने) लयलूट करून सीमोल्लंघन करणे. या सणाचा मुख्य उद्देश आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून याच दसऱ्याला आता राजकारणाची किनार लाभली आहे. मुंबईत होणाऱ्या दोन्ही शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यासह बीड जिल्ह्यातील दोन दसरा मेळाव्याने अख्ख्या राज्याने लक्ष वेधले आहे. यात प्रामुख्याने मराठा नेत्यांची मोठी गोची झाली आहे. विविध राजकीय पक्षांत राहूनही केवळ समाज म्हणून मनोज जरांगे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नेत्यांसमोर 'आता कोणता झेंडा घेऊ हाती' असा प्रश्न उभा ठाकला आहे.


    

बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा दसरा मेळावा गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत भरविण्यात येतो. या मेळाव्याची जुनी परंपरा आहे. तिच परंपरा उध्दव ठाकरेंनी पुढे चालू ठेवली. शिवसेना दुभंगल्यानंतर दोन वर्षांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मुंबईत दसरा मेळावा घेतात. याशिवाय भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे हे देखील बीड जिल्ह्यातील भगवान गडावर दसरा मेळावा भरवित होते. त्यांची ही परंपरा कन्या पंकजा मुंडे यांनी पुढे कायम चालू ठेवली. परंतु यंदा यात आणखी एका दसरा मेळाव्याची भर पडली. मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे‌ गेल्या वर्षभरापूर्वी अचानक प्रकाशझोतात आले. परिणामी मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर समाज एकवटलेला दिसतो आहे. त्यांनीही बीड जिल्ह्यातील नारायण गडावर दसरा मेळावा भरविण्याचे ठरविले. गेल्या काही दिवसांपासून या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. राज्यातून मोठा समुदाय जमा होणार असल्याचे गृहीत धरून मेळाव्याचे नियोजन केले गेले. विशेष म्हणजे या ठिकाणी भोजनासह निवास व्यवस्थाही असणार आहे. त्यामुळे मेळाव्यास मोठा समुदाय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सध्यातरी याच मेळाव्याची चर्चा राज्यात जास्त सुरू आहे.


विशेष म्हणजे बहुतांश नेते विविध राजकीय पक्षांच्या झेंड्याखाली राहून काम करीत असले तरी काहींचा जरांगेंना उघड तर काहींचा छुपा पाठिंबा आहे. यामध्ये भाजपसह दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काॅंग्रेसच्या मराठा नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पक्षश्रेष्ठींच्या मर्जीबरोबरच त्यांना समाज म्हणून जरांगेंना पाठिंबा देणे अपरिहार्य बनले आहे. ही गोष्ट वर्षभरापासून झाकून राहिली नाही. त्यामुळे हे उघड 'गुपित' आहे. परंतु आता एकाच दिवशी भाजपसह दोन्ही शिवसेना व जरांगे असे एकूण चार दसरा मेळावे होऊ घातले आहे. त्यामुळे आता कोणत्या दसरा मेळाव्याला हजेरी लावायची? असा पेच या नेत्यांसमोर उभा राहिला आहे. 


विशेषतः जरांगेंच्या होणाऱ्या मेळाव्याने मोठी पेचाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीचे रणशिंग केव्हाही फुंकले जाऊ शकते. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे समाजही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यापेक्षाही समाजाची मते महत्त्वाची आहेत. परंतु असे असले तरी दुसरीकडे पक्षाचा 'टिळा' भाळी असल्याने त्या मेळाव्यात उपस्थिती लावणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या तुलनेत मराठेतर नेत्यांनाही या समाजाची मते अपेक्षित आहे. परंतु त्यांच्या न जाण्याने फारसा फरक पडणार नाही. समाजाचाचे नेते न गेल्यास याचा विचार समाजबांधव नक्कीच करतील. अशा परिस्थितीत नेमका काय निर्णय घ्यावा? या पेचात मराठा नेते आहेत. एकाचवेळी होऊ घातलेल्या पक्षांच्या दसरा मेळाव्यासह जरांगेंच्या मेळाव्याने नेतेमंडळीही गलितगात्र झाली आहे. 


इकडे आड, तिकडे विहिर

स्थानिक पातळीवर दोन्ही शिवसेनेसह भाजपमध्ये मराठा नेते भरमसाठ आहेत. एकीकडे पक्षश्रेष्ठींचे फर्मान दुसरीकडे समाज म्हणून जरांगेंप्रती असलेल्या सहानुभूतीने नेत्यांची अवस्था 'इकडे आड, तिकडे विहिर' अशी झाली आहे.

छाया स्त्रोत - गुगल 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top