लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
अंगणवाडी सेविकेच्या पदोन्नतीसाठी ४० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वैजापूर येथील पंचायत समिती कार्यालयातील एकात्मिक बालविकास विकास प्रकल्प अधिकाऱ्यासह शिपायास जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ०४ आॅक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे.
एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल सुनील चव्हाण व शिपाई अनंता सुर्यभान बुट्टे अशी दोघा पैसे घेणाऱ्या लाचखोरांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील शहाजतपूर येथील तक्रारदाराच्या पत्नी या मौजे शहाजतपूर येथे सन २०१५ पासून अंगणवाडीमध्ये मदतनीस आहेत. त्यांना दिनांक १७ मार्च २०२३ रोजी अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यात आली होती. परंतु उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका पदाच्या पदोन्नती देण्यास स्थगिती दिल्यामुळे तक्रारदाराच्या पत्नीची अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती झाली नाही. त्यानंतर दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी अंगणवाडी सेविका पदोन्नतीची स्थगिती न्यायालयाकडून उठविण्यात आल्याने नियमितपणे मदतनिसांना अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती देण्याचे आदेश देण्यात आले.
त्यामुळे तक्रारदार व त्यांच्या पत्नी या दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी अंगणवाडी सेविका पदोन्नतीबाबत चर्चा करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल चव्हाण याला भेटले. त्यांनी तक्रारदार यांच्या पत्नीला अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती . जर तुम्ही पैसे नाही दिले तर तुमची अंगणवाडी सेविका पदावर वेळेवर पदोन्नती देणार नाही. असे सांगितले. चव्हाण याने तक्रारदारास 'साहेब म्हणतात ते पैसे देऊन टाका. बाकी काय असेल ते मी मॅनेज करतो'. असे म्हणाला. त्यानंतर तक्रारदाराने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून चव्हाण याच्याविरुद्ध लाच मागणीबाबत तक्रार केली होती.
त्यानंतर १ आॅक्टोबर २०२४ रोजी लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार हे पंचासमक्ष शिपाई अनंत बुट्टे याला भेटले. त्यावेळी बुट्टे याने चव्हाण हे मिटींगसाठी बाहेरगावी असल्याने तक्रारदारास ३ आॅक्टोबर रोजी येण्यास सांगितले. त्यानंतर ३ आॅक्टोबर रोजी लाचमागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार हे बुट्टे याला भेटले असता त्याने चव्हाण हे मिटींगसाठी बाहेरगावी गेले असल्याने दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. त्यानंतर ४ आॅक्टोबर रोजी तक्रारदार चव्हाण याच्या कार्यालयात साक्षीदार विशाल साळुंखे व ज्ञानेश्वर मुलमुले यांच्यासोबत भेटले असता चव्हाण याने तक्रारदारास २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती त्यांच्याकडून २० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.
तसेच तक्रारदारासोबत असलेले साक्षीदार विशाल काळुंखे व ज्ञानेश्वर मुलमुले यांना प्रत्येकी दहा हजार रुपये लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. तक्रारदार व साक्षीदार हे लाचेची रक्कम घेऊन आल्यानंतर सदर लाचेची रक्कम बुट्टे याने चव्हाण याच्या सांगण्यावरून स्वीकारून लाचेची रक्कम चव्हाण याच्या दालनातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवत असताना बुट्टे याच्यासह दोघांनाही लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान याप्रकरणी वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.