अखेर चिकटगावकरांची माघार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप घडविणाऱ्या घटना वैजापूर तालुक्यात घडत आहेत. या भूकंपामुळे मतदारांनाच हादरे बसू लागले आहे. आज अशीच घटना तालुक्याच्या राजकारणात घडल्याने राजकीय पंडितांसह मतदारांच्या भुवया उंचावल्या आहेत. वैजापूरच्या शिंदेसेनेच्या आजी आमदारांसह ठाकरेसेनेच्या माजी आमदारांनी एकाच व्यासपीठावर एकत्र येत दर्शन घडवून 'हम साथ - साथ हैं' नारा दिला आहे. दरम्यान दोन वर्षांच्या कालावधीनंतर दोघांनीही 'मिले सूर मेरा तुम्हारा' चा सूर आळवून मतदारांनाच धक्का दिला आहे.
असं म्हणतात की, राजकारणात कुणीच कुणाचे कायमचं शत्रू नसतं वा मित्रही नसतं. याचीच प्रचिती पुन्हा मतदारांना आली. ठाकरेसेनेला 'जय महाराष्ट्र' केल्यानंतर माजी भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय भूमिका घेतात? याबाबत जनतेला उत्सुकता लागून होती. अखेर चिकटगावकरांच्या भूमिकेचे गूढ उलगडले असून त्यांनी शहरातील सूरज लाॅन्समध्ये आयोजित कार्यक्रमातील व्यासपीठावरून आपला 'निर्धार' जाहीर केला.
होय..! मी शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्यासोबतच असल्याचे ठणकावून सांगितले. यावेळी चिकटगावकरांनी राजकारण्यांनी मला कसे 'खिंडीत' गाठून संपविण्याचा कसा प्रयत्न केला. याचा पाढाच वाचून दाखविला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना माझ्यासोबत कसे डावपेच खेळले गेले. त्यामुळे मला पक्ष सोडून ठोंबरे कुटुंबाकडे सुपूर्द करावा लागला. राष्ट्रवादीला मी मतदारसंघात पहिल्या क्रमांकावर आणून अनेक पदे मिळून दिली.
ठाकरेसेनेत असताना मेहनतीसह अर्थिक झळ सोसून ऐन पडत्या काळात पक्ष उभा केला. परंतु पक्षातील काही घरच्या 'भेदींनी' निवडणुकीत सक्षम उमेदवार द्या. असा नारा लावून धरला. पक्षात कुणीतरी येणार असल्याची भणक लागली अन् 'सक्षम' शब्दाचा अर्थ तेव्हा मला उमगला. दोन्हीही पक्षांनी तर आपले रंग उधळून माझा 'गेम' केला.
परंतु बहुतांश निवडणुकीत डाॅ. दिनेश परदेशींसह ठोंबरे व झांबडांसाठी धावलो. परंतु ह्यांनी माझ्यासाठी काय केले? असा प्रश्न उपस्थित करून येथे उपस्थित असलेल्या सर्वांनी यावेळी मला साथ द्या, यापुढे तुम्ही म्हणाल ते मी ऐकेल. अशी भावनिक साद घातली. दरम्यान यावेळी अभय पाटील चिकटगावकर, अजय पाटील चिकटगावकर, प्रशांत शिंदे, उत्तम निकम, रिखब पाटणी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तात्यांचे भाषण अन् सरांची एंट्री.!
चिकटगावकरांनी 'या निवडणुकीत आपला पाठिंबा आपण रमेश बोरनारेंना जाहीर करीत आहोत' असे म्हणत असतानाच आमदार रमेश बोरनारे यांची लाॅन्समध्ये एंट्री झाली. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर बोरनारेंनी ध्वनिक्षेपकाचा ताबा घेतला.
६० - ४० चा फाॅर्म्युला
चिकटगावकरांनी येथून पुढील काळात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत बोरनारे व आमच्यात ६० - ४० फाॅर्म्युला असणार आहे. असेही सांगितले.
आयुष्यभराचे ॠण - आ. बोरनारे
आम्ही एकमेकांविरुद्ध निवडणूक लढलो. पण खालच्या पातळीवर जाऊन चिखलफेक केली नाही. चिकटगावकरांची साथ मिळाली. हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. असा विश्वासही बोरनारेंनी व्यक्त केला.