होय.! मी रामगिरी महाराजांचा सच्चा भक्त
'माझी आमदारकी गेली तरी चालेल'. परंतु आम्ही हिंदुत्वाला तिलांजली देणार नाही. मी मठाधिपती रामगिरी महाराजांचा सच्चा भक्त आहे. परंतु हिंदुत्व सोडणार नाही. असा खणखणीत इशारा वैजापूरचे शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी विरोधकांना दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी वैजापूर येथे पदाधिकारी व पक्ष कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी आमदार बोरनारे बोलत होते. गेल्या काही दिवसांपूर्वी सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराजांनी एका धर्माच्या संस्थापिकाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानामुळे वैजापूर तालुक्यासह राज्यातील विविध शहरांत आंदोलने, रास्तारोको, दगडफेकीच्या घटना होऊन आगडोंब उसळला होता.
या घटनेवरून बरेच दिवस राजकारण तापले होते. त्यानंतर आमदार बोरनारेंनी मौन सोडून संतापाला वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले की, मी 'धर्मवीर - २' बघितला. यात साधारणतः चार वर्षांपूर्वी पालघर येथे दोन साधूंची दगडाने ठेचून निघृणपणे हत्या करण्यात आली होती. हे दृश्यही चित्रित करण्यात आले आहे. त्यामुळे वैजापूर येथेही 'धर्मवीर -२' होतो की काय? असं मला वाटायला लागलं. त्यामुळे मी पुन्हा सांगतो की, 'होय..! मी रामगिरी महाराजांचा सच्चा भक्त आहे. त्यांच्यामुळे माझी आमदारकी गेली तरी चालेल'. परंतु त्यांच्या विचारांचा मी पाईक असून सांधूसंताचे विचार विधानसभा मतदारसंघात पोहोचविण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
महाराजांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चोत जाऊ नका. असे मला अनेकांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले. परंतु मोर्चात जाण्याचा माझा निश्चय दृढ होता. हिंदुत्व आमच्या रक्तात आहे. वैजापूर तालुक्यात सराला बेटासह तीन मोठे धार्मिक संस्थाने आहेत. या सांप्रदायाची मतदारसंघात एक लाखापेक्षा जास्त मते आहेत. विधानसभा निवडणुकीत याचे उत्तर मिळणार आहे. त्यामुळे हिंमत असेल तर मैदानात या. असा सज्जड इशाराही बोरनारे यांनी विरोधकांना दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत मुद्दा तापणार
दरम्यान ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रामगिरी महाराजांचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्याचे राजकारण ढवळून निघालेले असतानाच आता सभा, राजकीय कार्यक्रमात नवीन मुद्द्यांनी रान पेटले आहे.