'उत्कृष्ट संसदपटू' पुरस्काराचे वितरण
आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आमदारांना महाराष्ट्र विधी मंडळातर्फे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यात वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांचाही समावेश आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते आ. रमेश बोरनारे यांना 'उत्कृष्ट संसदपटू' पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. |
पुरस्कारासाठी विधानसभा मतदारसंघात सक्रिय असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आमदारांचे सार्वजनिक जीवनातील योगदान, प्रतिष्ठा आणि सार्वजनिक जीवनातील सक्रिय सहभाग, वक्तृत्वशैली, जनहिताच्या प्रश्नांबाबत जागरुकता असणे आवश्यक आहे. प्रश्नांची प्रासंगिकता आणि त्यांचे गांभीर्य, सभागृहात विषयाचे सादरीकरण, भाषेतील प्रवीणता, विधानसभेच्या नियमांचे व कार्यपद्धतीचे ज्ञान, सभागृहाच्या आत व बाहेरील नियमांचे व कार्यपद्धतींचे पालन, सभागृहाच्या सूचनांचे पालन, विविध समित्यांमधील काम आणि उपलब्धी, सार्वजनिक जीवनातील आचरण, सदनाच्या चालीरीती व चालीरीतींबद्दलचा दृष्टिकोन. सभागृहात सुव्यवस्था, शांतता आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी सहकार्य आणि योगदान, सभागृहातील उपस्थिती, सभागृहात विचारलेल्या प्रश्नांची गुणवत्ता आदी निकषांच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार दिला जातो.
आमदार बोरनारे यांना सन २०२३-२०२४ चा 'उत्कृष्ट संसदपटू' पुरस्कार देण्यात आला. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोरनारे यांना गौरविण्यात आले. दरम्यान आ. बोरनारे यांना पुरस्काराने गौरविण्यात आल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला.
'उत्कृष्ट संसदपटू' पुरस्कार मिळाल्याचा नक्कीच आनंद आहे. त्यापेक्षा वैजापूर विधानसभा मतदारसंघात केलेल्या कामांचे फलित म्हटल्यास अधिक योग्य ठरेल. मतदारसंघातील मतदारांचा विश्वास व केलेल्या कामांच्या पावतीमुळेच इथपर्यंत पोहोचलो. याचा मला सार्थ अभिमान आहे.
- प्रा. रमेश बोरनारे, आमदार, वैजापूर