Ex MLA Bhausaheb Patil Chikatgaonkar | अखेर माजी आमदारांची सेनेशी 'फारकत'; जिल्हाप्रमुखांनी घात केला.. घात..निवडणूक लढविणारच!

0

विधानसभेची उमेदवारी नाकारल्याचे कारण


वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर ( Vaijapur Ex MLA Bhausaheb Patil Chikatgaonkar) यांच्या राजकीय पक्ष बदलाबाबत गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात मोठी चर्चा झडत होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. चिकटगावकरांनी उबाठा (Ubt Shivsena ) शिवसेनेशी 'फारकत' घेत असल्याचे मंगळवारी एका पत्रपरिषदेत जाहीर केले. दुसऱ्या उमेदवारास पक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला उमेदवारी नाकारल्यामुळेच उबाठा सेनेला आपण 'जय महाराष्ट्र' करीत असल्याचे चिकटगावकरांनी स्पष्ट केले. त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) किंवा मनोज जरांगे ( Nationalist Congress Party Sharad pawar Or Manoj Jarange ) हे दोन पर्याय आपल्या समोर असून कोणत्याही परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणूक लढविणारच! असा निर्धारच त्यांनी केला आहे. दरम्यान चिकटगावकरांनी पक्ष सोडल्यामुळे स्थानिक पातळीवर मोठे खिंडार पडले आहे.

 

माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर 
 

वैजापूर शहरातील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर म्हणाले की, साधारणतः दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर मी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या अटीवरच मी प्रवेश केला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात विधानसभा निवडणुकीत उबाठाकडून दुसऱ्या कुणाला तरी उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू होती. याबाबत मी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर त्यांनीही या वृत्तास दुजोरा दिला. 'निवडणुकीत तुम्हाला उमेदवारी मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले'. 

वैजापूर येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत बोलताना माजी आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर व अन्य.

त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मी पूर्ण औपचारिकता पूर्ण करून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा वरिष्ठांकडे पाठविला आहे. आगामी भूमिकेबात व दिशा ठरविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मतेही जाणून घेतली. या बैठकीत कार्यकत्यांनी मतं व्यक्त केली. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच मी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी ‌सांगितले. दरम्यान चिकटगावकरांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डावलल्यामुळे ही बाब त्यांच्या तितकीच जिव्हारी लागली आहे. हेही मात्र त्यांच्या बोलण्यातून लपून राहिले नाही. या पत्रकार परिषदेस अजय पाटील चिकटगावकर, दिनकर पवार, उत्तम निकम, साईनाथ मतसागर, प्रशांत शिंदे, अमोल बावचे आदी उपस्थित होते.


जिल्हाप्रमुखांकडून विश्वासघात 

सेनेच्या जिल्हाप्रमुखांनी विधानसभा उमेदवारीबाबत मला शब्द दिला होता. परंतु ऐनवेळी त्यांनी विश्वासघात करून मला उमेदवारी नाकारली. अशी खदखदही त्यांनी स्पष्ट शब्दात व्यक्त केली.  


'सक्षम' उमेदवार सर्वश्रुत 

 सेनेशी 'काडीमोड' घेतल्यानंतर चिकटगावकर स्पष्टच बोलले. स्थानिक कार्यकर्ते नेहमी म्हणायचे की, 'निवडणुकीत सक्षम उमेदवार द्या'. त्यामुळे येत्या १५ सप्टेंबरला 'तो' सक्षम उमेदवार 'सर्वश्रुत' होणार असल्याचा खोचक टोला त्यांनी हाणला.


निवडणूक आखाड्यात हमखास 

विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्का आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नेत्यांशीही प्राथमिक बोलणी झाली आहे.‌ तिकडे नाहीच 'शिजले' तर मनोज जरांगेंनी विधानसभेच्या २८८ जागा लढविण्याचे जाहीर केलेले आहेच. तिकडेही माझी जाण्याची तयारी आहे. शरद पवार व उद्धव ठाकरे यांची आघाडी असली तरी वैजापूरची जागा राष्ट्रवादीला काॅंग्रेसला सोडवून घेण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. तसे नाहीच झाले तर मतदारांची बैठक घेऊन त्यांच्या म्हणण्यानुसार मी निवडणूक 'आखाड्यात' हमखास उतरणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. 'लड़ेंगे या मरेंगे' अशा आशयातूनच चिकटगावकरांनी ठणकावून सांगितले.

 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top