शिवसंवाद मेळाव्यात खोचक टीका
राज्य सरकारकडून थेरं सुरू आहे. 'सरकार आपल्या दारी' नाटकाचे प्रयोग जोरात सुरू आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' फसवी असून जनतेचाच पैसा पुन्हा त्यांनाच देऊन फुशारकी मारली जात आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही. कर्जाचा डोंगर झालेला असताना त्यांना कर्जमाफी नाही. राज्यात कल्याणकारी व स्थिर सरकार पाहिजे असेल तर येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप - शिंदे सरकारला खाली खेचा. असे आवाहन उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैजापूर येथे केले. शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर ( मुलांची) शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ठाकरे बोलत होते.
वैजापूर येथे आयोजित शिवसंवाद मेळाव्यात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. |
खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विनोद घोसाळकर, चंद्रकांत खैरे, मिलिंद नार्वेकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ठाकरे म्हणाले की, मी वैजापूर येथे पुन्हा एकदा 'मशाल' पेटवायला आलो आहे. राज्यकर्त्यांना शिवसेना का नको आहे तर त्यांना राज्य लुटायचे आहे. सध्याही तेच चालू आहे. महिलांची मते मिळविण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण अशी फसवी योजना चालू केली आहे. योजना चालू केली. परंतु अनेक महिला या योजनेपासून वंचित राहत असल्याची ओरड सुरू झाली आहे. या योजनेवरूनही सरकारमध्ये श्रेयवाद सुरू आहे. आम्हाला कुणाचे उपकार ना कुणाचा पैसा नको आहे. आम्हाला आमचे न्यायहक्क हवे आहेत.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पैसे नाही म्हणतात. मी सत्तेवर आल्यानंतर प्रथम शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. एकीकडे सरकारकडे योजना सुरू करण्यासाठी पैसा आहे. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नाही. शेतकऱ्यांना पीककर्ज , पीकविमा मिळाला नाही. सरकारने एक रुपयात पीकविमा सुरू केला होता. तिथेही फसवेगिरी केली. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काही गद्दार आमच्या छाताडावर बसले. परंतु आता आगामी विधानसभा निवडणुकीत हे चित्र नसेल.
नरेंद्र मोदींनीही देशातील जनतेला ठेंगा दाखवला. लोकसभा, राममंदिर गळायला लागले. त्यामुळे आगामी काळात ते असेही म्हणायला बसले की, 'आम्ही काही केले नसले तरी गळून दाखविले'. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या चुका केल्या. त्या आता करू नका. असे सांगून शिवसेनेच्या पाठीशी रहा. असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले. संजय राऊत यांनीही राज्य सरकारवर घणाघात केला. याप्रसंगी संजय निकम, प्रकाश चव्हाण, देविदास वाणी, लिमेश वाणी, सचिन वाणी, अविनाश गलांडे,संकेत वाणी, नंदकिशोर जाधव, विठ्ठल डमाळे, अक्षय साठे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक समस्यांचा विसर.!
ठाकरेंच्या सभेची मोठी उत्सुकता नागरिकांना होती. सध्या त्यांचा शिवसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने राज्यात दौरा सुरू आहे. विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत ठाकरे तडाखेबंद भाषण करून सरकारवर ताशेरे ओढतील. अशी अपेक्षा सर्वांनाच होती. परंतु तसे काही झाले नाही. त्यांच्या भाषणात नेहमीचेच मुद्दे असल्याने उपस्थितांचा भ्रमनिरास झाला. स्थानिक समस्यांचा कोणताही आढावा त्यांनी भाषणातून घेतला नाही.उपस्थितांना ते अपेक्षित होते.