MLA Ramesh Bornare | गौप्यस्फोट: पैशाने उमेदवारीचा घातला घाट; 'उलटं टांगण्या'वरून तापले राजकारण, ठाकरे - बोरनारे भिडले.!

0

 एकमेकांवर वार - पलटवार 


उबाठा पक्षप्रमुखांच्या (UBT Shivsena party Chief) सभेनंतर वैजापूर (Vaijapur) तालुक्यात राजकारण तापले असून चांगलेच 'रान' उठले आहे. पक्षप्रमुखांनी स्थानिक शिंदेसेनेच्या आमदराविरुध्द 'उलटं टांगून चोप देण्याची' भाषा वापरल्यानंतर शांत बसतील ते आमदार कसले. मग त्यांनीही शिवसेनाप्रमुखांनी (Shivsena chief) दोन्हीही काॅंग्रेसच्या वळचणीला जाऊन बसल्याचे चित्र बघितले असते तर 'ह्यांनाच' त्यांनी उलटं टांगलं असतं.' असा ठोशास ठोसा लगावला. ते एवढ्यावरच थांबले नाही तर गेल्या विधानसभा निवडणुकीत एका इच्छुकाकडून पैसे घेऊन उमेदवारी देण्याचा घाट घातला गेला होता. परंतु माझ्या रेट्यामुळे हा 'डाव' फसल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी ‌केला. आरोप - प्रत्यारोपांच्या फैरीमुळे नागरिकांचे चांगलेच 'मनोरंजन' होत आहे.



ऐन पावसाळ्यात वैजापूरच्या तापलेल्या राजकारणाची चर्चा जिल्ह्याच्या पटलावर सुरू आहे. एका पाठोपाठ घडणाऱ्या राजकीय उलथापालथी, आरोप - प्रत्यारोपांच्या फैरीमुळे राजकीय आखाडा चांगलाच रंगला आहे. यात शिवसेनेसह (Shivsena) ठाकरेसेना (UBT Shivsena party) असो की भाजप (BJP's). या तिन्हीही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी मोठे राजकीय 'स्फोट' घडविले. राजकारणात धक्क्यावर धक्के पहावयास मिळत असल्यामुळे तालुक्यातील नागरिक 'कोमात' गेले आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नेत्यांकडून 'शाॅकिंग'च कृती सुरू आहे. गेल्या आठवड्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वैजापूर येथे येऊन गेले. या दौऱ्यात त्यांनी शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे (Shivsena MLA Ramesh Bornare) यांच्यावर टिकेची झोड उठवली. 'यदाकदाचित माजी आमदार स्व. आर. एम. वाणी (R. M. Wani)  हयात असते तर त्यांनी आमदार रमेश बोरनारे यांना उलटं टांगून चोपले असते'. असे खोचक उदगार काढले. त्यामुळे ही बाब बोरनारेंच्या चांगलीच जिव्हारी लागली.


 त्यामुळे प्रतिशोधाची भावना अनावर झाली अन् त्यांनीही ठाकरेंवर पलटवार करून प्रत्त्युत्तर दिले. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पैसे घेऊन अन्य पक्षातील एकाला उमेदवारी देण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला. परंतु माझ्या रेट्यामुळे त्यांची 'डाळ' शिजली नाही. एवढेच नव्हे तर दोन्हीही  काँग्रेससोबत अभद्र युती करणाऱ्या उध्दव ठाकरेंना स्व.  बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) आज हयात असते तर त्यांनीच उलटं टांगले असते. असे म्हणत आमदार बोरनारेंनी हल्ला चढवला. इथेच ते थांबले नाही तर एका माजी मुख्यमंत्र्यांना अशी भाषा शोभते का? असा प्रश्न उपस्थित करून खरं तर मी ठाकरे घराण्यावर कधीच न बोलण्याचे ठरवले होते. 

परंतु त्यांच्या या 'रायवळ' भाषेनंतर माझा बांध फुटला अन् इच्छा नसतानाही बोलण्याची वेळ आली. ते इथे आल्यानंतर निवडणुकीतील  उमेदवाराच्या नावाची घोषणा करतील. असा आमचा अंदाज होता. परंतु ते आले आणि माझ्यावर टीका करून गेले. मला केवळ एवढेच सांगायचे आहे की, मागील निवडणुकीत मला सहज उमेदवारी मिळाली नाही. शेवटच्या क्षणी पैसे देणाऱ्याला उमेदवारी देणार होते. पण त्यांना भेटून माझे सामाजिक व राजकीय योगदान सांगितल्यानंतर मला उमेदवारी बहाल करण्यात आली. दरम्यान दोघांनीही एकमेकांवर 'तोंडसुख' घेतल्यानंतर या नाट्यावर पडदा पडेल. असे अपेक्षित असले तरी भविष्यात आणखी दोघे एकमेकांवर काय शाब्दिक वार करतात? हे येणाऱ्या काळात समजलेच!


सोशल मीडियावर धूम !

दरम्यान उध्दव ठाकरेंच्या कार्यक्रमानंतर त्यांच्या चित्रफिती ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल ( Social media viral) केल्या. आता आमदार रमेश बोरनारेंच्या चित्रफितींची सोशल मीडियावर धूम सुरू आहे. दोन्हीही पक्षांकडून चित्रफिती व्हायरल करण्याची जणू अहमहमिका लागली आहे.


राजकारणाची पातळी घसरली 

वैजापूरच्या राजकारणात (Politics ) सध्या गरमागरमीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत कुणीच कुणाला सोडायला तयार नाही. आरोप - प्रत्यारोप, रायवळ भाषा आदींमुळे नागरिकांची चांगलीच 'करमणूक' होत आहे. राजकारणाची पातळी आणि दिशा भरकटत चालली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभेपर्यंत काय - काय होऊ घातले. हे मात्र कुणालाच ठाऊक नाही.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top