ग्रा. पं. च्या पदाधिकाऱ्यांना अपहार भोवला
कामात अनियमितता करून बेकायदेशीर कामे करणाऱ्या वैजापूर तालुक्यातील सिरसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचासह उपसरपंच व अन्य दोन सदस्यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवले आहे. ३ सप्टेंबर रोजी हा निर्णय दिला आहे. तसेच ग्रामसेवकाविरुध्दही शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सरपंच सोनाली ज्ञानेश्वर वराडे, उपसरपंच सावकार भाऊसाहेब सिरसाठ,सदस्य दीपाली तात्यासाहेब निंबाळकर व विजय विश्वनाथ वराडे अशी अपात्र ठरविण्यात आलेल्यांची नावे आहेत. तसेच ग्रामसेवक डी. के. गिरी यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सिरसगाव येथील ग्रामपंचायतीच्या या पदाधिकाऱ्यांनी गावात बेकायदा कामे केल्यासह मनमानी कारभार करणे, बेकायदेशीर ठराव घेणे, सभेस अनुपस्थित राहणे, शालेय खोल्यांचे साहित्य विक्री करणे, पाण्याचा हौद तोडून अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन देणे व विकासकामांमधील अनियमितता आदी कारणांमुळे त्यांना अपात्र करावे.अशी मागणी बाबासाहेब आनंद साळवे यांनी विभागीय आयुक्तांकडे याचिकेद्वारे केली होती. ॲड. शरद भागडे यांच्यामार्फत हा दावा दाखल करण्यात आला होता.
या पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांची बाजू घेतली होती. तसेच नियमबाह्य ठराव घेऊन जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत पाडून शाळेचे साहित्य बेकायदेशीररित्या विक्री करून जवळपास २० लाख रुपयांचा अपहार केला होता.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केलेल्या चौकशीत हे पदाधिकारी दोषी आढळून आले होते. ग्रामसेवक डी. के. गिरी याच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. विभागीय आयुक्तांनी दोन्हीही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार सर्व चारही पदाधिकाऱ्यांना अपात्र घोषित केले आहे.
काय आहे आदेशात?
© जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चार पदाधिकाऱ्यांविरुध्द दाखल केलेला कारवाई अहवाल मान्य.
© शाळेच्या साहित्याच्या लिलावाची रक्कम निश्चित करून ती पदाधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात येऊन रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करावी. ही कारवाई मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी करावी.