वैजापूर न्यायालयाचा निकाल
अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एकास वैजापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दहा वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. २४ सप्टेंबर रोजी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
विठ्ठल बाळासाहेब खैरनार (३०, रा. हनुमंतगाव, ता. वैजापूर) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील पीडित अल्पवयीन मुलगी ही जानेवारी २०१७ तिच्या मामाकडे रहिवासास होती. ती शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एक ब्युटीपार्लरमध्ये कामाला होती. ती सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान तिथे असायची व सायंकाळी मामाच्या घरी परत जात असे. दरम्यान या कालावधीत ब्युटीपार्लर समोर असलेल्या एका खासगी दवाखान्यात कामाला असलेला विठ्ठल खैरनार याच्याशी तिची ओळख झाली. ओळखीची रूपांतर प्रेमात झाले.
ब्युटीपार्लर चालक महिलेला त्वचा रोग असल्याने २५ जानेवारी २०१७ रोजी घटनेतील पीडित मुलगी, विठ्ठल खैरनार व पार्लर चालिका असे तिघेही छत्रपती संभाजीनगर येथील दवाखान्यात गेले होते. दवाखाना आटोपल्यानंतर हे सर्वजण प्रोझोन मॉलमध्ये गेले. तिथे त्यांनी चित्रपट बघून नाश्ता केला. २० फेब्रुवारी २०१७ रोजी विठ्ठल व पीडित मुलगी एका कपड्याच्या दुकानात गेले व पीडित मुलीने तेथे कपडे खरेदी केले. या नंतर मुलगी विठ्ठलसह त्याच्या रूमवर गेली. परंतु रूम मालकाने त्याला मारहाण करून तिथून पिटाळुन लावले. त्यानंतर ते दोघेही पार्लरचालक महिलेकडे आले व तिला सर्व हकीकत सांगितली. तिनेही या दोघांना मारहाण करून येथून निघून जा. असे सांगितले. घडलेल्या प्रकरणानंतर सायंकाळी पाच वाजे दरम्यान ते दोघेही बसने छत्रपती संभाजीनगर येथे विठ्ठलच्या एका मित्राकडे पोहोचले. तिथे जेवण करून ते नागपूरला जाण्यासाठी रेल्वेत बसले.
दुसऱ्या दिवाशी ते नागपूरला पोहोचले तिथे विठ्ठलने त्याच्या मित्राकडून पैसे उसने घेऊन २२ फेब्रुवारी रोजी रेल्वेने ते नाशिक येथे पोहोचले. नाशिक जिल्ह्यातील बसवंत पिंंपळगाव येथे विठ्ठलने काम बघितले व त्याच गावात रूम घेऊन ते दोघे राहू लागले. या ठिकाणी विठ्ठल व पीडितेमध्ये अनेकदा शारिरीक संबंध झालेत. १७ मार्च २०१७ रोजी पोलिसांनी या दोघांना त्यांच्या खोलीवर जाऊन ताब्यात घेतले. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास आरोपी विठ्ठल खैरनार याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासले. यामध्ये पीडित मुलगी, तिच्या शाळेचे मुख्याध्यापक व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली. या साक्षी - पुराव्याच्या आधारे खटल्याचा निकाल देताना जिल्हा व अतिरिक्त न्यायाधीश एस . के. उपाध्याय यांनी आरोपी विठ्ठल खैरनार यास दहा वर्षे कारावास, ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे तर कलम ३६३ व ३६६ (अ) मधून आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड बाळासाहेब माहेर यांनी कामकाज बघितले. पैरवी अधिकारी म्हणून विठ्ठल जाधव व हवालदार दादासाहेब गायकवाड यांनी त्यांना सहकार्य केले.
छाया स्त्रोत - गुगल