वैजापूर न्यायालयाचा निर्णय
वृद्ध वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना दरमहा ४० हजार रुपये देण्याचे आदेश वैजापूर येथील न्यायालयाने दिले आहेत. न्यायाधीश डी. एस. पिसाळ यांनी हा निर्णय दिला आहे.
वैजापूर तालुक्यातील नादी येथील वयोवृद्ध निवृत्ती रावजी तनपुरे (७२) यांना चार मुले आहेत. त्यांची पत्नी मयत झाली असून मुले त्यांचा सांभाळ करीत नाही. त्यामुळे खाण्यापिण्यावाचून त्यांची उपासमार होत आहे. तसेच ते आजारी राहत असल्याने औषधोपचारावाचून त्यांचे हाल होत आहेत. त्यांनी जमीन देखील मुलांना वाटून दिल्याने उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे निवृत्ती तनपूरे यांनी पोटगी मिळावी यासाठी न्यायालयात ॲड. बी. बी. भवर यांच्यामार्फत दावा दाखल केला.
मात्र निवृत्ती यांची मुले न्यायालयात हजर झाली नाही. चारही मुले कमावती आहेत. त्यांना नोकरी ,व्यवसाय व शेतीपासून उत्पन्न मिळते.परंतु ते वडिलांचा सांभाळ करीत नव्हते. न्यायाधीश डी. एस. पिसाळ यांनी वयोवृद्ध वडिलांचा भरणपोषण म्हणून चार मुलांनी दरमहा प्रत्येकी १० हजार म्हणजे चाळीस हजार रुपये इतकी रक्कम निवृत्ती यांना देण्याचा निकाल दिला आहे.तसेच दाव्याचा खर्च म्हणून एक हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवृत्ती यांच्या सुभाष,अशोक,बाळू व शिवाजी या मुलांना चांगलाच दणका बसला आहे.
छाया स्त्रोत - गुगल