महसूल व पोलिसांना आत्मपरीक्षणाची गरज
वाळू भरण्यासाठी जाणाऱ्या हायवा ट्रकने एका शाळकरी मुलाचा बळी घेतल्याची घटना २० सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास तालुक्यातील लाडगाव येथे घडली. या घटनेमुळे गोदापात्रातील वाळू उपशाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चिमुकल्याचा गेलेला बळी अन् याच संताप आणि उद्रेकातून गावकऱ्यांनी पेटविलेला हायवा या बाबी महसूल व पोलिसांना आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या आहेत. गोदाकाठच्या गावातील नागरिक माफियांच्या हैदोसामुळे त्रस्त झालेले असताना प्रशासन मात्र ढिम्म आहे.
वाळू भरण्यासाठी भरधाव जाणाऱ्या हायवाने शाळकरी मुलाला चिरडल्याची घटना वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथे घडली होती. यानिमित्ताने पोलिस व महसूल प्रशासनाची अकार्यक्षमता चव्हाट्यावर येऊन 'शी- थू' झाली. या घटनेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या ११ वर्षीय चिमुकल्याचा नाहक बळी गेला. याचाच अर्थ मरण किती स्वस्त झाले. याची प्रचिती या घटनेवरून येते. वाळूमाफियांचा धुमाकूळ ही बाब गोदाकाठच्या नागरिकांना नवीन नाही. वाळू वाहतूक अधिकृत होती की अनधिकृत? हा येथे प्रश्न नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून गोदापात्रात माफियांचा जो 'नंगानाच' सुरू आहे. त्याला लगाम घालण्यात स्थानिक पोलिस व महसूल यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे.
ज्याप्रमाणे कोळशाच्या धंद्यात दलाली करणाऱ्यांचे हातही काळे होतात. अगदी त्याचप्रमाणे या धंद्यातही सर्वच यंत्रणांचे हात 'बरबटलेले' आहे. 'एम' व्हिटॅमिनमुळे सर्वच 'मिंधे' वाळू उपशाचा तमाशा बघत असतात. माफियांकडून 'रसद' पुरविली जात असल्यामुळे कुणी मरो किंवा जखमी होवो. याचं कुणालाच काही देणेघेणे नाही. एखादी घटना झाल्यानंतर काहूर उठते अन् तात्पुरता उपसा बंद होतो. पुन्हा काही दिवसांनंतर 'पहले पाढे पंचावन्न' या उक्तीनुसार माफियांसह अधिकाऱ्यांना 'रान' मोकळे होते. गोदापात्र म्हणजे माफियांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी खाती 'गव्हाण' आहे. त्यामुळे या बरकतीच्या धंद्यातून 'वरकमाई' जास्त असल्याने ही मंडळी सरकारी कार्यालये सोडून थेट गोदापात्रात उतरली आहे. वर्षोनुवर्षांपासून हा वाळूचा धंदा बिनबोभाटपणे सुरू आहे. प्रशासकीय यंत्रणेतील सरकारी 'बाबू' सर्व जबाबदाऱ्या अगदी 'इमानेइतबारे' चोखपणे पार पाडत असल्याने माफियांसह त्यांनाही 'सुगीचे' दिवस आहे.
गोदाकाठच्या गावकऱ्यांनी कितीही उपोषणे, तक्रारी करा. संवेदनाशून्य प्रशासनातील अधिकाऱ्यांवर तीळमात्र परिणाम होत नाही. उपसा करण्यासाठी 'घरचेच भेदी' माफियांच्या दावणीला बांधलेले असल्यामुळे दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न आपसूकच पडतो. परवाची घटना झाली ती नक्कीच दुःखद आहे. परंतु घटनेनंतर जो उद्रेक झाला तो पोलिस आणि महसूल अधिकाऱ्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. हायवा पेटून दिल्याची घटना या दोन्हीही यंत्रणेबाबत पराकोटीचा रोष दर्शविणारी होती. त्यामुळेच संतप्त ग्रामस्थांनी पोलिस व अग्निशमन यंत्रणेला आग विझविण्यासाठी विरोध करीत होती. परिणामी पोलिस आणि सर्वच यंत्रणेला या घटनेला नकळत आपणही कुठेतरी जबाबदार असल्याची जाणीव झाली असावी. त्यामुळे समोर हायवा जळत असतानाही 'खजिल'पणे उभे राहून हा उद्रेक पाहण्याशिवाय या यंत्रणेकडे पर्याय उरला नव्हता.
यंत्रणेसमोरच हायवा जळून खाक झाला. बहुतांश वाळूच्या वाहनांचे चालक हे मद्यधुंद असतात. ही बाबही अनेकवेळा समोर आली आहे. त्यामुळे अशा घटनांना निमंत्रण मिळते. वाळू वाहतूक कायदेशीर किंवा बेकायदेशीर हा वेगळा मुद्दा आहे. परंतु वाहने किती बेदरकारपणे चालवितात? हा मुख्य मुद्दा आहे. कुणाच्या जिवावर बेतेपर्यंत वाहने निष्काळजीपणाने चालविली जात असेल तर या बाबीवर नक्कीच टाच आणली पाहिजे.या घटनेमुळे वाळूची वाहने गावातून जाऊ देण्यास गावकऱ्यांनी निर्बंध घातला आहे. तसा ठरावही लाडगाव ग्रामपंचायतीने संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे. एकंदरीतच वाळू माफियांचा खुलेआमपणे सुरू असलेला धुडगूस, बेदरकारपणे वाहने चालविल्यामुळे जाणारे बळी, शासनाचा महसूल बुडवून वाळूपोटी जमा होणारी 'माया' स्वतःच्या 'घशात' घालणाऱ्या मंडळींनी खरोखरच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
भरधाव हायवाने शाळकरी मुलाला चिडल्याची घटना झाल्यानंतर ग्रामपंचीयतीने ठराव घेऊन तो संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे. यानंतर गावातून वाळूची वाहने जाऊ देण्यास निर्बंध घातला आहे. सर्वानुमते हा ठराव घेण्यात आला.
- विकास सुर्यवंशी, सरपंच, लाडगाव