नूतन मुख्याधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार
वैजापूर पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर धुळे महापालिकेच्या उपायुक्त मुख्याधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत.
वैजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत हे गेल्या चार वर्षांपासून येथे कार्यरत होते. परंतु त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या जागेवर धुळे महापालिकेच्या उपायुक्त संगीता नांदूरकर रुजू झाल्या असून मंगळवारी त्यांनी मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. बिघोत यांना पदस्थापना देण्यात आली नसून त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. बिघोत यांच्या बदलीचे वृत्त येऊन धडकताच स्थानिक राजकीय वर्तुळासह पालिका कर्मचारी चांगलेच आवाक झाले. त्यांच्या बदलीबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यामागे राजकारण आहे की आणखी काही षडयंत्र? याबाबत चर्वितचर्वण सुरू झाले आहे.
सन २०२३ मध्ये मे महिन्यात पालिका सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर तेव्हापासून पालिकेत प्रशासक म्हणून भागवत बिघोत कारभार सांभाळत होते. तत्पूर्वी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष डाॅ. दिनेश परदेशी यांच्या सहचारिणी शिल्पा परदेशी या नगराध्यक्ष पदावरून पायउतार झाल्या. सन २००१ पासून ते आजतागायत पालिकेवर डाॅ. परदेशींची एकहाती सत्ता होती. नाही म्हणायला पालिकेवर प्रशासकाराज असले तरीही डाॅ. परदेशींशिवाय पालिकेत आजही पान हलत नव्हते. अशा परिस्थितीत बिघोत यांची तडकाफडकी झालेली बदली हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. बिघोत यांचा कार्यकाळ संपत आला होता. असे असले तरीही त्यांची अचानक व तडकाफडकी झालेली बदली ही सर्वांसाठीच अनाकलनीय बाब आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिघोत यांच्या बदलीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.