अंतरवाली सराटीत घेतली भेट
उबाठा सेनेतून नुकतेच बाहेर पडलेल्या माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी शुक्रवारी मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले असून भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून वैजापूर तालुक्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे या बाबीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. |
ठाकरसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी 'मशाली'ला सोडचिठ्ठी दिल्याची घोषणा करून पक्षातून बाहेर पडले. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी नाकारल्याने आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) किंवा मनोज जरांगे असे दोन पर्याय आपल्यासमोर असल्याचे ते म्हणाले होते. जरांगेंनी विधानसभा निवडणुकीत राज्यातील २८८ जागा लढविणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे जरांगे मला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देतील. असा आत्मविश्वास चिकटगावकरांना होता. दरम्यान शुक्रवारी चिकटगावकरांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगेंची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? काही राजकीय विषयांवर बोलणे झाले का? असे चर्वितचर्वण सुरू झाले आहे. याबाबत 'उमेदवारीसाठी तुमचा विचार नक्कीच केला जाईल'. असे जरांगे यांनी सांगितले असल्याचे चिकटगावकरांनी स्पष्ट केले. चिकटगावकरांनी संकेत दिल्याप्रमाणे विधानसभा उमेदवारी संदर्भातच ही भेट असावी. असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात आहे. तो अगदी खराही ठरला. त्यामुळे चिकटगावकरांना जरांगेंकडून उमेदवारी निश्चित असल्याच्या तालुक्यात जोर धरू लागल्या आहेत. निवडणूक लढविण्याचा निर्धारच चिकटगावकरांनी बोलून दाखविल्याने उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी ते जिवाचे रान करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्याचे राजकारण चांगलेच तापलेले आहे. शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा घेतलेला समाचार, चिकटगावकरांनी ठाकसेनेतून बाहेर पडून घेतलेली फारकत, बहुचर्चित भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांच्या ठाकरेसेनेतील प्रवेशासाठी झालेले खलबते, भाजपचेच एकनाथ जाधव यांनी मतदारसंघावर ठोकलेल्या दाव्यामुळे तालुक्याचे राजकारण अस्थिर झाले आहे. त्यातच चिकटगावकरांच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय विश्लेषकांची आतापासूनच आकडेमोड सुरू झाली आहे. या भेटीच्या छायाचित्रांची सोशल मीडियावर सध्या मात्र धूम सुरू झाली आहे.
अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगेंची भेट घेतली. फारशी राजकीय चर्चा झाली नाही. मराठा आरक्षण मिळणे. आमचा मुख्य उद्देश आहे. असे सांगून यदाकदाचित मराठवाडा अथवा राज्यात विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करावयाचे झाल्यास तुमचा विचार नक्कीच करू. असा विश्वास मला त्यांनी दिला.
- भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी आमदार, वैजापूर