Dr Dinesh Pardeshi | अखेर डॉ. परदेशींच्या हाती उध्दवसेनेची 'मशाल'; भाजपला भगदाड

0

मुंबईत ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश 


भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी (Dr Dinesh Paradeshi) यांचा बहुचर्चित उबाठा शिवसेनेत (UBT Shivsena ) अखेर प्रवेश झाला. मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत डॉ. परदेशींनी शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह 'मशाल' हाती घेतली आहे. त्यामुळे या रखडलेल्या प्रवेशाच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.


वैजापूर येथील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.

ठाकरेसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केल्यानंतर भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांच्या ठाकरेसेनेतील प्रवेशावर 'मोहोर' लागली होती. या अनुषंगाने १५ सप्टेंबर रोजी वैजापूर येथे होणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमात डॉ. परदेशींसाठी 'पायघड्या'ही टाकण्यात आल्या होत्या. परंतु या प्रवेशाबाबत 'हाय व्होल्टेज ड्रामा' झाल्याने हा प्रवेशसोहळा तात्पुरता स्थगित होऊन त्यांच्या प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. 


याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. परंतु तब्बल दहा दिवसांनंतर या प्रवेशाला अखेर मुहूर्त लागला अन् डाॅ. परदेशींनी शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह बुधवारी मुंबई गाठली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेशसोहळा पार पडला. त्यामुळे भाजपला मोठे भगदाड पडले असून गेल्या काही दिवसांपासून वैजापूर तालुक्याच्या राजकारणात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.


प्रवेशसोहळा रोखल्याचीच चर्चा जास्त 

दरम्यान डॉ. परदेशींना मशाल हातात घ्यायचीच होती तर ते वैजापूर येथे झालेल्या कार्यक्रमातही घेऊ शकत होते. दरम्यानच्या काळात त्यांना काही दिवस 'पाॅज' घेण्याची गरज नव्हती. असाही एक मतप्रवाह आहे. परंतु खरी अडचण काय होती? हे मात्र त्यांनाच ठाऊक आहे. असे असले तरी डॉ. परदेशींच्या प्रवेशसोहळ्याची जेवढी चर्चा झाली नाही. त्यापेक्षा अधिक चर्चा त्यांचा प्रवेशसोहळा रोखला गेल्यानंतर झाली. एवढे मात्र खरे!



भाजप, काॅंग्रेस, भाजप व्हाया ठाकरेसेना

डॉ. परदेशींनी भारतीय जनता पक्षातून आपला राजकीय प्रवास सुरू केला होता. त्यानंतर काॅंग्रेसमध्ये गेले. ते काॅंग्रेसमध्ये सर्वाधिक काळ राहीले. सन २०१८ मध्ये नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये गेले होते. आता भाजप व्हाया ठाकरे सेनेत गेले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top