प्रवेशाला तात्पुरता 'ब्रेक';चर्चेला पूर्णविराम
भाजप नेत्याच्या ठाकरेसेनेतील प्रवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून 'हाय व्होल्टेज ड्रामा' सुरू होता. परंतु या चर्चेला तात्पुरता पूर्णविराम मिळाला आहे. वैजापूर येथे उबाठा पक्षप्रमुखांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात हा बहुचर्चित प्रवेश होईल. असे अपेक्षित असतानाच ऐनवेळी या पक्ष प्रवेशास 'ब्रेक' लागला. त्यामुळे ठाकरेंच्या सभेत या भाजप नेत्याच्याच प्रवेशाची सर्वांना उत्सुकता होती.
या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (UBT Shivsena Leader Uddhav Thackeray ) यांच्या प्रमुख उपस्थितीत वैजापूर (Vaijapur ) येथे शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. डाॅ. परदेशींच्या प्रवेशाची जय्यत तयारी करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर भव्य वाॅटरप्रूफ मंडप, गाड्याघोड्या असे काटेकोर नियोजन करण्यात आले होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून शहरात वेगवेगळ्या अफवांचे पेव फुटले अन् एकच वादंग उठले. त्यांचा प्रवेश होईल की नाही? याबाबत तालुक्यासह राजकीय वर्तुळात चर्चा झडू लागल्या.
डाॅ. परदेशी गेल्या तीन दिवसांपासून 'नाॅट रिचेबल' असल्याने या प्रवेशाबाबत मोठा 'सस्पेन्स' निर्माण झाला होता. भाजप असो की उबाठा शिवसेना. या दोन्हीही पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते 'मौन' धरून होते. खरी परिस्थिती कुणालाच कळायला तयार नाही. परंतु ठाकरेंच्या आगमनानंतर डाॅ. परदेशींची अचानक 'एंट्री'. होऊन हा प्रवेश होईलच. असे कयासही स्थानिक पातळीवर बांधले जाऊ लागले. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे डाॅ. परदेशींच्या समर्थक, कार्यकर्त्यांचा चांगलाच भ्रमनिरास झाला. शेवटी ज्या अपेक्षेने काहीजण आले होते. ते हिरमुसलेल्या चेहऱ्याने माघारी फिरकले. परंतु असे असले तरी ठाकरेंच्या सभेत डाॅ. परदेशींच्या प्रवेशाची उपस्थितांमध्ये उत्सुकता होती. हेही मात्र तितकेच खरे.!
ठाकरेंकडून उल्लेख नाही
ठाकरेंनी आपल्या भाषणातून नरेंद्र मोदीसह राज्य सरकारवर सडकून टीका केली. परंतु डॉ. दिनेश परदेशी यांच्या प्रवेशाबाबत 'ब्र' शब्दही काढला नाही. वास्तविक पाहता ठाकरे याबद्दल काहीतरी संकेत अथवा बोलतील. अशी अपेक्षा उपस्थितांना होती. परंतु तसे झाले नाही. यामागचे कारण त्यांनाच ठाऊक!
गर्दी उत्सुकतेपोटीच !
पक्षप्रमुख ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले असल्याने त्यांचे वलय आहेच. परंतु आज वैजापूर येथे झालेल्या सभेत जी गर्दी झाली. ती ठाकरेंपेक्षा डॉ. परदेशींच्या प्रवेशाच्या उत्सुकतेपोटी जास्त होती. हेही तेवढेच सत्य आहे.
प्रवेश नेमका कधी?
बहुचर्चित डाॅ. दिनेश परदेशींचा प्रवेश या कार्यक्रमात झाला नाही. त्यामुळे आगामी त्यांचा ठाकरेसेनेत सेनेत प्रवेश होणार का? की आहे त्या पक्षात नांदणार? याशिवाय त्यांची आणखी काही रणनीती आहे? याचा खुलासा मात्र डॉ. परदेशींकडूनच होऊ शकतो. त्यामुळे ते शहरात येऊन आपली भूमिका केव्हा स्पष्ट करणार? याबाबत राजकीय वर्तुळासह सर्वांनाच उत्सुकता आहे.