विधानसभेचे 'चक्रव्यूह' भेदण्याचे प्रयत्न
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यात राजकारणाचा (politics) घोडेबाजार झाला असून निवडणुकीपूर्वीच 'पोळा' फुटला आहे. माजी आमदारांची ठाकरे सेनेशी झालेली 'फारकत', माजी नगराध्यक्षांच्या ठाकरे सेनेतील प्रवेशाच्या चर्चेमुळे राजकारण ढवळून निघाले आहे. अशा परिस्थितीत दोन तगड्या उमेदवारांचे आव्हान पेलण्यासाठी विद्यमान आमदारांनी व्यूहरचना आखली आहे. विधानसभेचे 'चक्रव्यूह' भेदण्यासाठी सर्वांनीच शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे.
राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाचे लोण आता गाव खेड्यांपर्यंत पोहोचले अन् 'सत्तेसाठी वाटेल ते' रणनीतीचा अवलंब सुरू झाला. इथे थांबायला कुणीच तयार नाही. कोणत्याही परिस्थितीत 'आमदारकी' पटकावयाचीच. असा चंग सर्व इच्छुकांनी बांधल्याने राजकारणाचा 'खुर्दा' झाला आहे. असं म्हणतात की, राजकारण नेहमीच संधी शोधत असतं. तसंच काहीसं वैजापूर तालुक्यातील राजकीय आखाड्यात पहावयास मिळत आहे. विधानसभा निवडणूक पुढे असली तरी राजकारणाचा आखाडा आजच रंगला आहे. विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायची राजकीय महत्त्वाकांक्षा असल्याने सर्वांनीच उचल खाल्ली आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे.
सर्वप्रथम युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमास ठाकरे सेनेचे(Ex MLA Bhausaheb Patil Chikatgaonkar) माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांच्या ( तात्या ) अनुपस्थितीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. येथूनच राजकीय घडामोडींना वेग आला. तत्पूर्वी भाजपचे माजी नगराध्यक्ष ( Dr. Dinesh Pardeshi) डॉ. दिनेश परदेशींच्या (भाऊ ) ठाकरे सेनेच्या प्रवेशाची चर्चा काही प्रमाणात सुरू होती. परंतु या आठवड्यात राजकीय हालचालींना मोठा वेग आला. डाॅ. परदेशींच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले अन् दुसरीकडे चिकटगावकरांनी ठाकरे सेनेशी 'फारकत' घेत असल्याचे जाहीर केले. 'सक्षम' उमेदवाराच्या कारणावरून पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी देण्यापासून डावलले. त्यामुळे आपण 'मशाल' सोडत असून याचे सर्व खापर जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंवर फोडले. ही बाब चिकटगावकरांच्या जिव्हारी लागल्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसची 'तुतारी' वाजविण्याच्या तयारीत आहेत. परंतु आता माघार नाहीच. कसंही करून विधानसभेची 'सर्कस' जमवायचीच. तसे त्यांनी बोलूनही दाखविले. चिकटगावकर मातब्बर व चतुरस्त्र राजकारणी आहेत. ते नेमके काय व कसे पाऊल उचलतात? याबाबत राजकीय वर्तुळात औत्सुक्य आहे.
एकीकडे चिकटगावकरांनी मशाल सोडली तर दुसरीकडे भाजपचे 'दबंग' नेते डॉ. दिनेश परदेशी 'मशाल' हाती घेण्यासाठी सरसावले आहेत. तेही यंदा थांबवण्याच्या मनस्थितीत नाही. गेल्या २५ वर्षांपासून पालिकेवर एकहाती सत्ता गाजविल्यानंतर 'आमदारकी'ने त्यांनाही 'भुरळ' घातली आहे. त्यामुळे त्यांनीही 'तोडो - फोडो'ची नीतीचा अवलंब करीत ठाकरे सेनेशी 'सूत' जुळविलेच. डाॅ. परदेशींची 'शस्त्रक्रिया' यशस्वी झाली खरी. परंतु त्यांच्या प्रवेशानंतर मशाल किती 'धगधगते' अन् त्यांचा निर्णय किती योग्य आहे? यावर आज भाष्य करणे योग्य होणार नाही. चिकटगावकर व परदेशींच्या अनुक्रमे फारकत व पक्ष प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. उभयतांनी आपापल्या पक्षाशी फारकत घेतली खरी. परंतु दोहोंच्या फारकतीत फरक आहे. डाॅ. परदेशींना 'नांदायला' पक्ष मिळाला तर चिकटगावकरांना 'सोयरीक' करण्यापासून ते नांदायला 'पक्ष' रुपाने 'घरधनी' शोधावा लागणार आहे.
अशा परिस्थितीत शिंदेसेनेचे (MLA Ramesh Bornare) आमदार रमेश बोरनारे (सर) वरकणी शांतता ठेवून असले तरी त्यांचीही व्यूहरचना जोरदार सुरू आहे. त्यांच्यासमोर या दोन तुल्यबळ उमेदवारांचे आव्हान असणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून 'सर'सेनापती बोरनारे केव्हाही निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहे. आपल्या भाषणातून विरोधकांवर टीका - टिप्पणी न करता सतत कार्यमग्न व त्याहीपेक्षा जनसंपर्क ठेवण्यावर भर देत आमदारकीच्या पाच वर्षांत नेहमीच 'अॅक्टिव्ह मोड'वर राहून तत्पर असणारे बोरनारे धनुष्यबाणाची 'प्रत्यंचा' खेचून तयारच आहे. त्यामुळे धनुष्यबाण कुणाला 'घायाळ' करतो? मशाल किती धगधगते अन् तुतारी किती वाजते? या प्रश्नांची उत्तरे विधानसभा निवडणुकीनंतर मिळतील. तोपर्यंत मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जाधव बंधूही ठोकणार शड्डू
विधानसभा निवडणुकीसाठी तीन वेगवेगळ्या पक्षांकडून तीन प्रमुख दावेदार आहेच. याशिवाय भाजपचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य एकनाथ जाधव हे देखील 'दम' धरायला तयार नाही. सन २०१४ मध्ये ऐन मोदी लाटेत मतदारसंघात जाधवांच्या रुपाने भाजपचे 'कमळ' फुलण्याऐवजी पाकळ्याच 'गळून' पडल्या. परंतु यंदाही ते 'शड्डू' ठोकण्याच्या तयारीत आहे. तसेच त्यांचे थोरले बंधू जे. के. जाधव हेही निवडणुकीत 'प्रहार' करण्याच्या बेतात आहे. शरद पवार गटाचे मंजाहरी गाढेंनी पक्षश्रेष्ठींकडे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी रुपाने 'तुतारी' वाजवायचा 'हट्ट' धरला. एकंदरीतच राजकीय परिस्थिती पाहता 'रात्र कमी, सोंगे फार' असे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.
ज्याचा कंटाळा त्याचाच वानोळा.!
फारकत आणि प्रवेशाच्या 'घबाडग्यात' मात्र अनेकांची मुस्कटदाबी झाली आहे. गेल्या काही दिवसांपापूर्वी काहींनी पक्ष सोडला होता. भाजप, काॅंग्रेस सोडून ठाकरेसेनेत व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार) गेलेल्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्यांच्या 'अवघड' जागी दुखणं झाले आहे. ज्यांच्यामुळे पक्ष सोडला अन् पुन्हा तेच 'वाट्याला' आले. त्यामुळे 'ज्याचा कंटाळा त्याचाच वानोळा' अशी त्यांची गत झाली आहे.
भाजप पुन्हा 'पोरकी'
डाॅ. परदेशींनी ठाकसेनेत जाण्याच्या निर्णय घेतल्याने स्थानिक भाजपचे कमळ 'कोमेजून' जाण्याच्या स्थितीत आहे. सन २०१८ मध्ये त्यांच्या प्रवेशामुळे भाजपचे कमळ 'फुलले' होते. परंतु डाॅ. परदेशींच्या पक्षांतरामुळे भाजप पुन्हा 'पोरकी' झाली आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
डाॅ. परदेशींचा दुजोरा नाही
डाॅ. परदेशींच्या प्रवेशाची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असली तरी या प्रवेशाच्या वृत्तास स्वतः त्यांनी दुजोरा दिलेला नाही. परंतु असे असले तरी त्यांचे समर्थक, कार्यकर्ते सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून एका अर्थाने दुजोराच देत आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर माजी आमदारांच्या शहरातील निवासस्थानी कार्यकत्यांची बैठकही पार पडली. शहरात १५ सप्टेंबरला होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या संवाद मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर छापण्यात आलेल्या डिजिटल फलकावर डाॅ. परदेशींच्या छायाचित्र अथवा नावाचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे त्यांच्या ठाकरेसेनेतील प्रवेशाबाबत मतमतांतरे असून संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.