लाडगाव येथील घटना
वाळू भरण्यासाठी भरधाव जाणाऱ्या हायवाने शाळकरी मुलाला चिरडल्याची घटना २० सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथे घडली. दरम्यान शाळकरी मुलाला चिरडल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी हायवा पेटवून दिला. घटनेनंतर पोलिसांसह अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. परंतु गावकऱ्यांनी त्यांनाही पिटाळून लावले. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे.
साईनाथ रामनाथ निंबाळकर ( ११ रा. लाडगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, साईनाथ हा गावातीलच शाळेत इयत्ता पाचवीत शिकत होता. चार वाजता शाळा सुटल्यानंतर तो घरी जात असताना वाळू भरण्यासाठी भरधाव वेगाने जात असलेल्या हायवाने जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना बसस्थानकासमोर घडली. त्याला याच अवस्थेत नागरिकांनी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
घटनेनंतर चालकाने लगेचच धूम ठोकली. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी हायवा पेटवून दिला. घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलिस दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या वाहनाला बोलाविण्यात आले. परंतु गावकऱ्यांनी त्या वाहनाला पिटाळून लावत पोलिसांनाही विरोध केला. त्यामुळे हायवा जळत होता. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वीरगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
वाळूचा विषय पुन्हा ऐरणीवर
दरम्यान या घटनेमुळे वाळूचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शासकीय कामांच्या नावाखाली गोदापात्रातील उपसा केलेल्या वाळूची बेसुमार वाहतूक सुरू आहे. महसूल अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला पूर्ण 'मोकळीक' दिल्याने तो बेफाम सुटला आहे. याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी करूनही अधिकाऱ्यांना त्याचे कसलेही सोयरसुतक नाही. हे विशेष!