५० टक्के होणार जलसाठा
नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणातील अतिरिक्त पाणी वैजापूर शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात सोडण्यात आले. धरणातून १०० क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला असून साधारणतः १५ ते २० दिवस हे पाणी सुरू राहण्याची शक्यता आहे. या दिवसांत धरणात ५० टक्के जलसाठा उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 'नारंगी'त पाणी सोडल्यामुळे वैजापूरकरांसह लाभक्षेत्रातील जवळपास २० गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान पालखेड धरणातील पाणी दाखल झाल्यानंतर शिंदेसेनेचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपासून पावसाअभावी कोरडेठाक असलेल्या शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणातील अतिरिक्त पाणी ६ सप्टेंबर रोजी सोडण्यात आले. सध्या पालखेड धरणातून १०० क्युसेकने विसर्ग सुरू असून साधारणतः १५ ते २० दिवस हा विसर्ग सुरू राहणार आहे. या माध्यमातून धरणात जवळपास ५० टक्के जलसाठा उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने या जिल्ह्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरून 'ओव्हरफ्लो' झाली आहेत. त्यामुळे या धरण समूहातील जलसाठा गोदापात्रात सोडण्यात आला. त्यामुळे पैठण येथील जायकवाडी जलाशयात जवळपास ९५ टक्के जलसाठा झाला आहे. जायकवाडी जलाशयात मोठा जलसाठा झाल्याने कोणत्याही क्षणी जलाशयाचे पाणी गोदापात्रात सोडण्यात येऊ शकते. अशी परिस्थिती आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणही ओव्हरफ्लो झाल्याने हे पाणी वैजापूरच्या नारंगी मध्यम प्रकल्पात सोडण्यात आले. यापूर्वीच्या कालव्याची अवस्था बिकट झाली होती. ठिकठिकाणी फुटणाऱ्या कालव्याच्या कामासाठी आमदार रमेश बोरनारे यांनी ३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने कालव्याची वहनक्षमता वाढली आहे. परिणामी सध्यस्थितीत कालव्यातून १०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. यापूर्वी वहनक्षमता कमी असल्याने ५० पेक्षा अधिक क्युसेकने विसर्ग होत नव्हता. गेल्या दोन वर्षांपासून नारंगी प्रकल्पात मुबलक जलसाठा न झाल्याने यंदा मात्र शहरवासीयांना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवले. शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे नाशिक जिल्ह्यावर अवलंबून असल्याने पाटबंधारे विभागाकडून जेव्हा आवर्तन सोडण्यात येते. तेव्हाच शहरवासीयांची तहान लागते. नाशिक पाटबंधारे विभागाने आवर्तन सोडण्यास कुचराई केल्याने वैजापूकरांना या उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागला. परंतु पालखेड धरणातून सोडण्यात आलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे नारंगी प्रकल्प ५० टक्के भरल्यास येणारा उन्हाळा वैजापूकरांना नक्कीच सुसह्य झाल्याशिवाय राहणार नाही. पाणी सोडल्यामुळे शहरवासीयांसह लाभक्षेत्रातील २० गावांतील शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.
आमदारांच्याहस्ते जलपूजन
शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्यात आल्यानंतर पाणी शनिवारी 'नारंगी'त दाखल झाले. त्यानंतर आमदार रमेश बोरनारे व गुलामगिरी महाराज यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव, दीपक राजपूत, माजी नगराध्यक्ष साबेरखान, संजय बोरनारे, रणजित चव्हाण, काळू वैद्य, अमोल बोरनारे, गणेश इंगळे आदींसह लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नारंगी मध्यम प्रकल्पात सध्या १०० क्युसेकने विसर्ग सुरू असून येत्या १५ ते २० दिवस हे पाणी सुरू राहणार आहे. या पाण्यामुळे नारंगी प्रकल्पात ५० टक्के जलसाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
- भागवत बिघोत, मुख्याधिकारी, न.प. वैजापूर