Motorcycle Thieves | चोरांच्या आवळल्या मुसक्या; सहा दुचाकी हस्तगत

0

तिघेही खंडाळा येथील रहिवासी  


वैजापूर शहर व परिसरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या तिघांच्या वैजापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून सहा दुचाकी हस्तगत केल्या. ०३ ऑगस्ट रोजी पोलिसांनी ही कारवाई केली. पकडलेले तिन्हीही भामटे तालुक्यातील खंडाळा येथील रहिवासी आहेत. 


वैजापूर पोलिसांनी पकडलेले हेच ते तीन दुचाकीचोर. 

 रवी रमेश मगर , संदीप मधुकर बागुल (दोघे रा. खंडाळा) व नितीन सखाहरी भारसकर (रा.महालगाव, ह.मु. खंडाळा) असे पोलिसांनी पकडलेल्या भामट्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जानेवारी रोजी शेषराव विठ्ठल मुळे (रा.अलापूरवाडी) यांची प्लॅटिना मोटारसायकल  (क्रमांक एम. एच. २० ओ.बी. ०६४५)  शहरातील फुलेवाडी रस्त्यावरून  चोरी गेली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, तालुक्यातील खंडाळा येथील रवी मगर व त्याच्या अन्य साथीदारानी 'ती' मोटरसायकल चोरी केली आहे. पोलिसांच्या पथकाने खंडाळा येथे जाऊन रवी यास मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. 


गुन्ह्याची दिली कबुली 

परंतु पोलिसी खाक्या दाखवताच  'संदीप व नितीन यांच्या मदतीने मोटारसायकल चोरी केली' अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. तिघांना ताब्यात घेऊन पोलिसांंनी कसून चौकशी केली असता त्यांनी वैजापूर शहरातून आणखी काही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या पाच मोटारसायकली व एक अॅक्टिव्हा अशा सहा दुचाकी जप्त केली. या चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान ठाणेप्रमुख श्यामसुंदर कौठाळे, हवालदार योगेश झाल्टे, वाल्मिक बनगे, वाल्मिक मेटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top