चोरटे श्रीरामपूरचे रहिवासी
वैजापूर शहरालगत असलेल्या एका मंगलकार्यालया समोरून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी ११ ऑगस्ट रोजी मुसक्या आवळल्या आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी चोरट्यांंकडून सहा मोटरसायकली जप्त केल्या आहेत. दरम्यान पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना जेरबंद केले.
वैजापूर पोलिसांनी पाठलाग करून दुचाकीचोरांना पकडले.
ऋषिकेश कैलास जाधव (रा.सुतगिरणी परिसर, श्रीरामपूर जि. अहमदनगर) व तुषार बाळू जाथव (रा. रमानगर, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चोरवाघालगाव येथील रहिवासी अजय जाधव हे २० एप्रिल रोजी शहरालगत असलेल्या द्रौपदी लॉन्स येथे एका समारंभासाठी आले होते. नेमके याचवेळी मंगलकार्यालयाबाहेर उभी केलेली त्यांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा ऋषिकेश जाधव याने केला असून तो तालुक्यातील महालगाव येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला महालगाव येथून ताब्यात घेतले. 'सदरचा गुन्हा आपण साथीदार तुषार जाधव याच्या सोबतीने केला' अशी कबुली यावेळी त्याने पोलिसांना दिली. दोघांकडून पोलिसांनी सहा मोटारसायकली जप्त केल्या.
पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी, पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख, हवालदार योगेश झाल्टे, ज्ञानेश्वर मेटे, वाल्मिक बनगे, नवनाथ केरे, पवन सुंदर्डे, रणजित चव्हाण, अजित नाचन यांच्या पथकाने केली.