दुचाकींसह विद्युतपंप हस्तगत
वैजापूर तालुक्यातील नांदगाव येथून मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डी.बी. स्कॉड) मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या दोन मोटरसायकलींंसह विद्युतपंप असा एकूण ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वैजापूर पोलिसांनी पकडलेले हेच ते दोन भामटे. |
अमोल लक्ष्मण थोरात (रा.चांडगाव) व मोहन नाना बागुल (रा.देवठाण ता.येवला जि.नाशिक) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडीत शेकू वरे (रा.देवठाण ता. येवला) हे १० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील नांदगाव येथे आले होते. यावेळी त्यांनी त्यांची मोटारसायकल ( क्रमांक एम.एच. ०२ बी. ई. ५४४४) एका गिरणीसमोर उभी केली होती. दरम्यान ही मोटारसायकल दोघांनी चोरून नेली. घटनेनंतर पंडीत वरे यांनी वैजापूर पोलिस ठाणे गाठून दोघांनी मोटरसायकल चोरी केल्याची तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास करीत असताना वैजापूर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे योगेश झाल्टे यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा अमोल थोरात याने त्याचा साथीदारासोबत केला आहे. लगेचच पथकाने चांडगाव येथे जाऊन अमोल थोरात यास ताब्यात घेतले.
'मोटरसायकल चोरीचा गुन्हा आपण मोहन बागुल याच्या साथीने केला असून त्याच्याच शेतात मोटारसायकल लावली आहे' अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांंनी देवठाण येथे जाऊन मोहन याला देखील ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांंनी चोरीच्या दोन मोटारसायकली व तीन अश्वशक्तीचा चोरी केलेला विद्युतपंप देखील जप्त केला. ही कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार,सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे (डी.बी. स्कॉड) प्रमुख योगेश झाल्टे, महेश बिरुटे, ज्ञानेश्वर मेटे, वाल्मिक बनगे यांनी ही कारवाई केली.