सोन्यासह ऐवज लंपास
चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांंनी हजारो रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार ११ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आला. वैजापूर तालुक्यातील पानवखंडाळा शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांंविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर वाबळे यांची पानवखंडाळा शिवारात गट क्रमांक ५३ मध्ये शेतजमीन असून ती कसून ते उपजीविका भागवितात. या ठिकाणी ते पत्नी ज्योती मुलांबाळासह रहिवासास आहेत. दरम्यान शनिवारी रात्री साडेनऊ वाजता वाबळे कुटुंबीय नेहमीप्रमाणे जेवण आटोपून तिथेच असलेल्या एका पत्र्याच्या खोलीत झोपी गेले. रविवारी पहाटे पाच वाजता ज्योती या झाडाझूड करण्यासाठी उठल्या. यावेळी सोन्याचे दागिने ठेवलेली पत्र्याची पेटी घरात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
लगेचच त्यांनी पतीला देखील झोपेतून जागे केले व पेटी घरात नसल्याचे सांगितले. दरम्यान ज्ञानेश्वर यांनी देखील पेटीची शोधाशोध सुरू केली. अखेर पेटी न सापडल्याने पेटीत असलेले दीड तोळ्यांचे दागिने व रोकड असा एकूण ४५ हजार ८०० रूपये किंमतीचा ऐवज चोरी झाल्याचे त्यांची खात्री झाली. याशिवाय शेजारीच राहणारे अक्षय शेषराव रहाणे यांचे देखील पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल संच व रोख रक्कम असा २० हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज चोरी गेल्याचे त्यांना समजले. या दोन्ही घटनेप्रकरणी ज्ञानेश्वर वाबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया स्त्रोत - गुगल