Sub Divisional Officer | डाॅ. जऱ्हाडांची बदली अन् 'हाय व्होल्टेज ड्रामा', वैजापुरात नाट्यमय घडामोडी

0

अखेर बदलीस स्थगिती


उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या राज्यशासनाने बदल्या करून नूतन ठिकाणी पदस्थापना केली. यात वैजापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांचाही समावेश होता. त्यांची जालना येथे बदली करण्यात आली. परंतु त्यांची तडकाफडकी झालेली बदली पुन्हा रद्द करून त्यांना वैजापूरलाच ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला. दरम्यान त्यांची अवघ्या १४ महिन्यांत झालेली तडकाफडकी बदली त्याच वेगाने रद्द झाली. वैजापूर शहरात पाठोपाठ व तितक्याच नाट्यमय घडामोडींमुळे तालुक्यातील नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.



डाॅ. अरुण जऱ्हाड यांची वैजापूरच्या उपविभागीय अधिकारीपदी साधारणतः १४ महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. ते सुरवातीला रुजू झाल्यानंतर त्यांनी संयमाने काम केले. शहराबाहेरून जाणाऱ्या गंगापूर चौफलीसह शहरातील येवला, स्टेशन व डेपो रस्त्यावरील अतिक्रमणे भुईसपाट करून धडाकेबाज कारवाई केली होती. परंतु त्यानंतर जानेवारी महिन्यात जऱ्हाड यांनी डेपो रस्त्यावरील वसंत क्लबचे गाळे नाममात्र भाडेतत्त्वावर घेणाऱ्यांसह जागा गिळंकृत करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा चंग बांधला. या कारवाईत त्यांनी काही गाळ्यांना सीलही ठोकले. नाममात्र भाडेतत्त्वावर देणाऱ्यांसह क्लबच्या जागेची 'हेराफेरी'चा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्धही त्यांनी कारवाईचे 'अस्त्र' उपसण्याचा प्रयत्न केला. ते कुणालाच जुमानायला तयार नसल्याने राजकीय नेत्यांचा 'इगो' दुखावला गेला. परिणामी राजकीय नेते त्यांच्या विरोधात गेले. वसंत क्लबचा 'आसरा' घेऊन अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे भुईसपाट करण्यासाठी तयारीनिशी कारवाई करण्याच्या बेतात असतानाच संक्रांतीच्या दिवशीच त्यांच्यावरच 'संक्रात' आली.


यात मोठमोठ्या धेंडांनी 'काळेबेरं' केलेले होते. या कारवाईमुळे आपले 'कारनामे' उघडे पडतील. याची धास्ती सर्वांनाच होती. परंतु संक्रांतीच्या दिवशी जऱ्हाड यांनी गच्चीवर पतंग उडविणाऱ्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह मोठ्या जमावाने एकत्र येत थेट पोलिस ठाण्यातच 'राडा' केला. जऱ्हाडांविरुध्द गुन्हा दाखल करून कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली होती. याचवेळी ठाण्यातही जऱ्हाड व काही राजकीय नेत्यांमध्येही शाब्दिक 'चकमक' उडाली होती. एवढेच नव्हे तर शहरात मोर्चे, आंदोलने करून शहर बंदची हाकही देण्यात आली होती. पोलिस ठाण्यात झालेल्या राड्यात प्रक्षोभक विधाने केल्याचा आरोप करून जऱ्हाडांनी काही राजकीय नेत्यांविरोधात फिर्यादही दिली होती. परंतु त्यांनी काही कारणास्तव पुन्हा 'नमते' घेत एक पाऊल मागे घेतले. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला असला तरी 'धग' कायम होती. एकंदरीतच उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांची तडकाफडकी झालेली बदली अन् त्याच गतीने मिळालेल्या स्थगितीवरून वैजापूर तालुक्यातील जनतेला 'हाय व्होल्टेज ड्रामा' बघावयास मिळाला.


'तोच' ठरला कळीचा मुद्दा 

डाॅ. जऱ्हाडांची अतिक्रमणे भुईसपाट करण्याची कारवाई स्वागतार्हच होतीच. या कारवाईचे वैजापूकरांनी स्वागतच केले. परंतु वसंत क्लबच्या लगतची अतिक्रमणे हटविण्याचा मुद्दा चर्चिला गेल्याने वातावरण तापले. या प्रकरणात त्यांनी विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कारवाई करणे अपेक्षित होते. थोडा वेळ देऊन कारवाई करायला हवी होती. असा एक मतप्रवाह होता. क्लबच्या लगतची अतिक्रमणे भुईसपाट होणार. या धास्तीने वातावरण तापले अन् त्यातूनच पुढे 'महाभारत' घडले. हाच कळीचा मुद्दा होऊन ठाण्यात 'राडा' झाला. जऱ्हाडांनी थोडं संयमाने घेण्याऐवजी आपलेच घोडं दामटल्याने त्यांना लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांच्या रोषाचे धनी व्हावे लागले अन् लोकप्रतिनिधी व त्यांच्यात संघर्षांची ठिणगी पडली. तेव्हापासून या दोहोतील 'अंतर" कायम होते.


आमदार बोरनारे जऱ्हाडांच्या 'पाठिशी'

दरम्यान या नाट्यमय घडामोडी सुरू असतानाच डॉ. जऱ्हाड संदर्भात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या कार्यकर्सोत्यांकडून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरलची धूम सुरू होती.  शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनीही या संदर्भात शासनाला पत्र लिहून जऱ्हाडांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे.


डाॅ.परदेशींचे 'डंके की चोटपर'

डाॅ.जऱ्हाडांच्या बदलीच्या वृत्ताने शहरात मोर्चे, आंदोलने झाली. तदनंतर भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी सर्व 'विसरून' थेट मुंबई गाठली अन् जऱ्हाडांची बदली रद्द करून आणली. तसा दावाही त्यांनी केला. त्यानंतर डॉ. परदेशींनी फेसबुक पेजवरून 'डंके की चोटपर' असे शिर्षक देऊन 'डाॅ. जऱ्हाड तुम्ही कुठेच जाऊ नका, इथेच थांबा'. नुसतं बसून ओरडून काही होत नाही. योग्य नियोजन केल्यावर 'कार्यक्रम' नक्की होतोच ! अशी पोस्ट व्हायरल करून धमाका केला. त्यांचा हा इशारा कुणाकडे होता? हे मात्र सूज्ञ जनतेला बरोबर कळाले. त्यानंतर त्यांच्या सहचारिणी तथा माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनीही या मुद्द्यांचे भांडवल करणाऱ्यांना संयमाने व तितक्याच 'दबंग' भाषेत सुनावले.


'आम्ही सदैव सोबत' 

दरम्यान या धामधुमीतच उबाठाचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या कार्यकर्त्यांनीही 'आम्ही सदैव सोबत' अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून बाजी मारली. चिकटगावकरांनी जऱ्हाडांच्या बदलीच्या स्थगितीचे श्रेय जनता आणि शासनाला दिले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top