आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण
एका समुदायाच्या धर्म संस्थापकाबाबत कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपावरून वैजापूर शहरात दोन दिवसांपूर्वी मोठा 'राडा' झाला होता. त्यानंतर वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. मात्र सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या अडचणीत वाढ झाली असून आणखी ३५३ (२) या कलमाची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान सराला बेटासह रामगिरी महाराजांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली असून त्यांच्या दिमतीला बंदूकधारी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पांचाळे येथे सुरू असलेल्या गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताह दरम्यान सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी महंमद पैगंबरांविषयी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. परिणामी १५ आॅगस्ट रोजी रात्री ८ वाजता शहरातील एका समुदायचा साधारणतः दोन हजाराचा मोठा जमाव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमून घोषणाबाजी केल्याने नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गासह वैजापूर - गंगापूर राज्य महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. त्याचवेळी दुसऱ्या एका ५०० ते ६०० जणांच्या समुदायाने याच परिसरात घोषणाबाजी सुरू केल्याने दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
दोन्हीही समुदाय एकमेकांवर चालून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिस व प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान या घटनेनंतर शहरासह तालुक्यात शांतता असून शहरातील व्यवहार सुरळीतपणे चालू होऊन विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले आहे. परंतु असे असले तरी मात्र शहरातील मुख्य चौकात राज्य राखीव दलाच्या जवानांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. याशिवाय उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांच्यासह तहसीलदार सुनील सावंत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी हे गेल्या तीन दिवसांपासून शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
काय आहे कलम ३५३
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध १५ आॅगस्ट रोजी रात्री धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०२ अन्वये वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता यामध्ये आणखी ३५३(२) या कलमाची वाढ करण्यात आली आहे. सार्वजनिक नुकसान होणे. अशा आशयाचे विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
जमावबंदी आदेश लागूच
या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी १९ आॅगस्टपर्यंत शहरासह तालुक्यात जमावबंदी आदेश लागू केले असून पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र फिरण्यास मनाई केली आहे.
सुरक्षेसाठी बंदूकधारी पोलिस
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सराला बेटावर जंबो पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यात सुरू असलेल्या सप्ताहाची शनिवारी सांगता होणार आहे. त्यानंतर मठाधिपती रामगिरी महाराज यांचे आगमन तेथे होण्याच्या अनुषंगाने सराला बेटासह त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी बंदूकधारी पोलिसांचा फौजफाटा सोबत आहे.
संपूर्ण राज्यात पडसाद
छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यासह राज्यात या घटनेचे पडसाद उमटून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान दोन दिवसांत शहर अथवा तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार झाल्याचे वृत्त नसून परिस्थिती नियंत्रणात आहेत. परंतु असे असले तरी शहरात पोलिसांचा फौजफाटा मात्र तैनात आहे. शहरातील बाजारपेठेतील व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले असून वैजापूकरांचे जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आले आहे.