४२ गॅस सिलिंडर पकडले
वैजापूर तालुक्यातील चांभारवाडी फाट्यावर पोलिसांनी अवैध गॅस सिलिंडर विक्री अड्ड्यावर छापा टाकून एक लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारस दहीवाळ व चाचा (पूर्ण नाव व गाव माहीत नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांंची नावे आहेत. याबाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई - नागपूर समृध्दी महामार्ग पुलाजवळ चांभारवाडी फाटा येथील हॉटेल साईच्या बाजूला एका शटरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठया प्रमाणात साठा करण्यात आला असून सिलिंडरची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती हवालदार किरण गोरे यांना मिळाली. त्यानुसार १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता त्यांना व्यावसायिक वापरासाठी असलेले गॅसने भरलेले ४२ तर १२ रिकामे असे एक लाख ६६ हजार रुपये किंमतीचा साठा आढळला.
दरम्यान दोघांनी संगनमताने मानवी जिवीतास धोका निर्माण होईल या पद्धतीने गॅस सारख्या स्फोटक पदार्थाबाबत बेदकारपणे व निष्काळजीपणाने वर्तन करुन व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैधरित्या साठा करुन स्वतःच्या फायद्यासाठी चोरटी विक्री करतांना मिळून आल्याने पारस दहीवाळ व चाचा (पूर्ण नाव व गाव माहीत नाही) या दोघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया स्त्रोत - गुगल