महिलेचे दागिने चोरणारे भामटे गजाआड
वैजापूर शहरातील येवला रस्त्यालगत असलेल्या बसस्थानकातून महिलेचे दागिने चोरी करणाऱ्या दोघा भामट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ३१ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पथकाने ही कारवाई केली. कारवाई दरम्यान त्यांच्याकडून चोरी केलेले दागिने हस्तगत केले आहे.
वैजापूर बसस्थानकातून महिलेचे दागिने चोरी करणाऱ्या भामट्यांसह पोलिस कर्मचारी. |
अतिक अय्युब शेख व सनी विलास ढोकरे (दोघे रा. बीफ मार्केट जवळ श्रीरामपूर, जि. अहमदनगर ) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपाली विजय भालेराव या तालुक्यातील शिवराई येथील रहिवासी आहेत. २० जूलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता शिऊर येथे जाण्यासाठी त्या वैजापूर बसस्थानकात आल्या होत्या. दरम्यान बसमध्ये जागा पकडण्यासाठी जात असताना चोरट्यांंनी त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरी केले. याप्रकरणी रुपाली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासकामी पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी पथकाकडे तपास सोपविला. सदर घटनेतील चोरटे हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी असल्याची माहिती पथकप्रमुख योगेश झाल्टे यांना खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे बुधवारी रात्री पोलिसांनी श्रीरामपूर गाठले. घटनेतील दोन्ही चोरटे हे एका बिअरबारमध्ये असल्याचे पोलिसांना समजले. सापळा रचून पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेले सोन्याचा नेकलेस, मोहनमाळ व पोत जप्त केली. पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, सहायक अधीक्षक महक स्वामी, उपविभागीय अधिकारी दिलीप भागवत , पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश झाल्टे, महेश बिरुटे, वाल्मिक बनगे, ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ते प्यायला 'बसले' अन् पोलिस गेले...
दरम्यान चोरीच्या या घटनेनंतर पोलिसांनी गतीने तपासचक्र फिरवली. गुन्ह्यातील चोरटे हे श्रीरामपूर येथील रहिवासी असल्याचे पथकाला समजले. बुधवारी रात्री पोलिसांनी श्रीरामपूर गाठले. यावेळी अतिक व सनी हे एका बिअरबारमध्ये 'बसल्याचे' त्यांना समजले. 'त्या' बारमधून पथकाने अतिक शेख याला ताब्यात घेतले परंतु पोलिस आल्याचे समजताच सनी ढोकरे याने तिथून पळ काढला. परंतु पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करत त्याला देखील ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या दोघांकडून अन्य गुन्ह्यांचीही उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.