Viral | 'त्याने' केले 'तिचे' छायाचित्र व्हायरल; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

शहरानजीकच्या महाविद्यालयातील प्रकार 


बदलापूर येथील एका शाळेतील दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण गाजत असतानाच शहरालगतच्या एका नामांकित महाविद्यालयातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढून छायाचित्र व्हायरल करून धमकी दिल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांविरुध्द वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अल्पवयीन मुलगी इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेत असून ती १९ आॅगस्ट रोजी शहरालगतच्या एका नामांकित महाविद्यालयात गेली असता याच महाविद्यालयातील दोन अल्पवयीन मुलांनी तिला गाठून यातील एकाने 'मागील वेळेस तुझे व्हिडीओ व्हायरल केले, ते कमी होते का? यावेळी तुझा शेवट करुन दाखवू. अशी धमकी दिली. त्यामुळे ती घाबरल्याने महाविद्यालयातील उपहारगृहाजवळ मैत्रिणींकडे नोट्स घेण्यासाठी गेली असता त्या दोघांनी तिचा पाठलाग करुन एकाने  मोबाईलवरून काही पोरांना फोन लावला. 


त्याचवेळी ती मुलगी घाबरून घरी निघून आली. घरी आल्यानंतर तिने आपबिती घरातील सदस्यांना सांगितली. त्यानंतर घरातील सदस्यांनी महाविद्यालयात जाऊन त्या मुलांची उलटतपासणी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. यातील एकाचा मोबाईल तपासला असता त्याने मुलीचे ओळखपत्र व्हाॅटस्अॅपवरून पाठविल्याचे दिसून आले. तत्पूर्वी या मुलीचे तालुक्यातील वीरगाव येथील एका मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत व्हिडिओ असल्याचे घरातील सदस्यांना त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजले. त्यावेळीही मुलीचे व्हिडिओ व्हायरल करून बदनामी केली होती. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांविरुध्द वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यवस्थापन काय करते?

दरम्यान शहरातील येवला रस्त्यावर असलेल्या या महाविद्यालयात मुलीची छेडछाड व व्हिडिओ व्हायरल करण्याचे प्रकरण घडत असतना व्यवस्थापन काय करते? असा प्रश्न आपसूकच पडल्याशिवाय राहत नाही. दोन दिवसांपूर्वी बदलापूर येथील प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर सर्वच शाळा व महाविद्यालयांनी मुलींच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु व्यवस्थापन अशा गंभीर घटनांकडे दुर्लक्ष करून कातडीबचाव धोरण स्वीकारीत आहे. परिणामी या घटनांचा उद्रेक होऊन हिंसक वळण लागते. त्यामुळे व्यवस्थापनाने वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top