१७ गावांना सतर्कतेचा इशारा
नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमधून ७० हजार क्युसेकने ओव्हरफ्लोचे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे. कदाचित हा विसर्ग वाढवून एक लाखापर्यंत याशिवाय अहमदनगर जिल्ह्यातील काही धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदापात्रात सध्या ९३ हजार ३३८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग वाढल्यास गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता आहे. विसर्ग वाढल्याने गोदावरी सध्या दुथडी भरून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील डोणगाव येथे आज आठवडी बाजार असल्याने डोणगाव व पुणतांबा येथील नागरिकांना 'अलर्ट'च्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गोदाकाठच्या १७ गावांतील नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहेत. नाशिक जिल्ह्य़ातील दारणा, पालखेड अन्य बहुतांश धरणं पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणांतील ओव्हरफ्लोचे पाणी निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमध्ये सोडण्यात आले आहे. त्यानंतर ६९, ३६७ हजार हजार क्युसेकने हे पाणी तेथून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीत या धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी गोदापात्रात सुरूच होते. परंतु २६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता हा विसर्ग ६९ हजार क्युसेकने करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात आणखी जोरदार पाऊस झाल्यास येत्या काही दिवसांत पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास तब्बल दोन वर्षानंतर गोदावरीला पूर येण्याची शक्यता आहे. शनिवारी व रविवारी नाशिक जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. दरम्यान गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने गोदाकाठच्या शेतकऱ्यांनी स्वतःसह जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार सुनील सावंत यांनी केले आहे.
गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील धरणांचे अतिरिक्त पाणी गोदापात्रात सोडल्याने तालुक्यातील नदीकाठच्या बाबतरा, डोणगाव, नांदूरढोक, लाखगंगा, पुरणगाव, बाभुळगावगंगा, सावखेडगंगा, अव्वलगाव, हमरापूर, नागमठाण, बाजाठाण, चेंडुफळ, भालगाव, चांदेगाव, डागपिंपळगाव, शनिदेवगाव व वांजरगाव या १७ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या हे पाणी पैठण येथील जायकवाडी धरणाकडे झेपावत आहे. सध्या गोदावरीच्या पाण्याची पातळी कमी आहे. त्यामुळे लगेच काठालगतच्या गावांना पुराचा धोका नसला तरी नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यास येत्या काही दिवसांत गोदावरी रौद्ररुप धारण करु शकते. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीच्या सुचना नागरिकांना दिल्या आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील पाणीही 'गोदे'त
वैजापूर तालुक्यातून जाणाऱ्या गोदापात्रातून सध्या ७० हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. परंतु गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे गोदावरी नदीला प्रवरा नदी येऊन मिळते. या नदीतून अहमदनगर जिल्ह्यातील धरणांतील ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. तेथून पुढे हा विसर्ग ९३ हजार ३३८ क्युसेकने जायकवाडीकडे झेपावत आहे.
नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांतून सुरू असलेला विसर्ग (क्युसेकने) असा-
गंगापूर - ७२२४
दारणा १०१२०
भावली - ५८८
भाम - २५६२
गौतमी - २५६०
वालदेवी -१८३
वाकी-९४५
कडवा - ४९३६
आळंदी - २४३
एन.एम. वेअर - ६९३६७
भोजापूर - १५२४
होळकर पूल - ९४७०
पालखेड - १७७३१
करंजवन - ६४८०
वाघाड - ३७०२
तिसगाव - ८०४
पुणेगाव - ३०००
ओझरखेड - ४४३१
नाशिक जिल्ह्यातील धरणातून गोदावरी नदीत ७० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील १७ गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच मंडळाधिकाऱ्यांसह तलाठी, पोलिस पाटील व कोतवालांनाही सूचना दिल्या असून नागरिकांनी नदीपात्राकडे जाऊ नये.
- सुनील सावंत, तहसीलदार, वैजापूर