वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
चिल्लर पैशांच्या वादातून वाहक व प्रवाशात फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार वैजापूर शहरातील बसस्थानकात १८ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडला. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून वैजापूर पोलिस ठाण्यात वाहक,चालक व प्रवासी अशा तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख इम्रान शेख रफिक (रा.मुस्तफा पार्क, वैजापूर) हे रविवारी छत्रपती संभाजीनगरहुन वैजापूरला येण्यासाठी बसमध्ये (क्रमांक एम.एच.०६ एस ८७१७) बसले. सकाळी सव्वाअकरा वाजता बस वैजापूर बसस्थानकात पोहोचली. बसस्थानक आल्याने प्रवासी शेख इम्रान यांचा वाहक गणपत श्रीराम म्हस्के (५७) यांच्याशी सुटे पैसे देण्या - घेण्याहून वाद सुरू झाला. यावेळी बसचालक देखील होते.
दरम्यान काही समजण्याच्या आत इम्रान व म्हस्के यांच्यात सुरू असलेल्या वादाचे पर्यावसान फ्री-स्टाईल हाणामारीत झाले. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी हे भांडण सोडविले. घटनेनंतर वाहक गणपत म्हस्के व प्रवासी इम्रान शेख यांनी वैजापूर पोलिस ठाणे गाठत परस्परविरोधी तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक फौजदार रामचंद्र जाधव करीत आहेत. दरम्यान बसस्थानकात झालेल्या या फ्री स्टाईल हाणामारीच्या घटनेने प्रवासी मात्र आवाक झाले.