४०० क्युसेकने विसर्ग, २२ दिवस आवर्तन
वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी खरिप हंगामासाठी अखेर ३१ आॅगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ४०० क्युसेकने नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले. या आवर्तनातून जवळपास दोन टीएमसी मुबलक पाणी मिळणार असून साधारणतः २० ते २२ दिवस आवर्तन सुरू राहणार आहे.
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील जलसाठे पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी दारणा समूहासह अन्य बहुतांश धरणांतील ओव्हरफ्लोचे पाणी गोदापात्रात सोडण्यात आले होते. परिणामी गोदेतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणात ८२ टक्के जलसाठा आहे. दरम्यान २२ आॅगस्ट रोजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी आवर्तन सोडण्याचे आदेश दिले होते. याशिवाय येथील नांदूर मधमेश्वर कालवा विभागात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही आमदार रमेश बोरनारे व प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीतही आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार २५ आॅगस्ट रोजी या दोन्हीही तालुक्यांसाठी कालव्यातून आवर्तन सोडण्यात येणार होते. परंतु दरम्यानच्या काळात वैजापूर व गंगापूर या दोन्हीही तालुक्यांत जोरदार पाऊस झाल्यामुळे कालव्यातून आवर्तन सोडण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला होता.
परंतु आमदार रमेश बोरनारे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांचा पाठपुरावा व शेतकऱ्यांच्या मागणीमुळे नांदूर मधमेश्वर कालव्यातून खरिप हंगामासाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार ३१ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमधून नांदूर मधमेश्वर कालव्यातून ४०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. हा विसर्ग दररोज वाढविण्यात येणार असून साधारणतः २० ते २२ दिवस चालणाऱ्या या आवर्तनातून जवळपास दोन टीएमसी पाणी दोन्हीही तालुक्यांना मिळणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील पाझर तलावांसह सार्वजनिक विहिरी व अन्य जलसाठे भरून घेण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या आवर्तनातून मोठ्या प्रमाणावर पाणी मिळणार असल्याने पाणीवापर संस्थांनी जास्तीत जास्त पाण्याची मागणी नोंदवावी. असे आवाहन नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाने केले आहे. दरम्यान 'नांमका'तून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे दोन्हीही तालुक्यांतील लाभधारक शेतकरी आनंदीत झाले असून या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न मार्गी लागणार आहे.
खरिपासाठी नाममात्र पाणीपट्टी
३१ आॅगस्ट रोजी सोडण्यात आलेले आवर्तन हे खरिप हंगामासाठी आहे. त्यामुळे आता सोडण्यात आलेले पाणी रब्बी हंगामातून कपात होणार नाही. रब्बी हंगामाच्या तुलनेत खरिप हंगामासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यासाठी नाममात्र पाणीपट्टी आकारली जाते. त्यामुळे पाणीवापर संस्थांनी पुढे येऊन जास्तीत जास्त पाण्याची मागणी नोंदवून या पाण्याचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे.
वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर कालव्यातून ३१ आॅगस्ट रोजी ४०० क्युसेकने आवर्तन सोडण्यात आले. २२ दिवस चालणाऱ्या या आवर्तनातून दोन्हीही तालुक्यांना जवळपास दोन टीएमसी पाणी मिळणार आहे. आवर्तनातून मुबलक प्रमाणात पाणी मिळणार असल्याने पाणीवापर संस्थांनी जास्तीत जास्त पाण्याची मागणी नोंदवावी.
- राकेश गुजरे, कार्यकारी अभियंता, नांमका, वैजापूर