Rainfall Update | पीके चांगली; परंतु जलसाठे तहानलेलेच !

0

सरासरीच्या निम्माही पाऊस नाही 


सतत अवर्षणप्रवण असलेल्या वैजापूर तालुक्याला यंदा पीक परिस्थिती बरी असले तरी अर्धा पावसाळा संपूनही तालुक्यातील प्रमुख जलसाठे कोरडेठाकच आहेत. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने लोटले तरी देखील अद्याप वर्षिक सरासरीच्या निम्मा देखील पाऊस झालेला नाही. याचाच अर्थ येणाऱ्या काही दिवसांत तालुक्यात दमदार पाऊस बरसला तरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अन्यथा आगामी काळात पुन्हा पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्यास नवल नाही.

 

वैजापूर शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात अजूनही जलसाठा झाला नाही.

     सन २०१९ ते २०२२ या कालावधीत वरुणराजाने तालुक्यावर मेहरनजर केली होती. या तिन्हीही वर्षात सर्वत्र दमदार पाऊस होऊन बहुतेक जलसाठे तुडुंब झाले होते. या काळात तालुक्याचे वर्षिक सरासरी पर्जन्यमान ५००.०२ मिलिमीटर इतके होते. परंतु तिन्ही वर्षात धो-धो पाऊस बरसलेल्या पावसामुळ पुढील काळात तालुक्याचे वर्षिक सराऊ पर्जन्यमान हे ६२५ मिलिमीटर इतके झाले. यंदाच्या हंगामात तालुक्यात आतापर्यंत २८० मिलिमीटर इतकाच पाऊस म्हणजेच सरासरीच्या निम्मा देखील पाऊस अद्याप झालेला नाही. या काळात पीक परिस्थिती चांगली असले तरी पाणीसाठा मात्र शून्यच आहे.



 पावसाळ्याचा अवघा दीड महिना उर्वरित असून या काळात अपेक्षित पाऊस न झाल्यास भविष्यात पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. जून महिन्यात तालुक्यातील गारज महसूल मंडळात सर्वाधिक २५५ मिलिमीटर तर जूलै महिन्यात देखील २२० मिलिमीटर इतका पाऊस तर जून महिन्यात लोणी ( खुर्द)  महसूल मंडळात सर्वात कमी म्हणजे ९९ मिलिमीटर व जुलै महिन्यात बाबतारा महसूल मंडळात ९७ मिलिमीटर इतका पाऊस बरसला. दरम्यान ऑगस्ट महिना निम्मा सरला असून या महिन्यात पावसाने काही प्रमाणात खंड दिला असून मागील दोन महिन्यांच्या तुलनेत या महिन्याच्या अद्यापपर्यंतच्या अपेक्षित सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. 


प्रशासकीय पातळीवर संभ्रम 

दरम्यान यंदापासून वार्षिक सरासरी पर्जन्यमानात वाढ झालेली असतानाच प्रशासकीय पातळीवर मात्र याबाबत अजूनही संभ्रम आहे. संबंधित अधिकाऱ्यांनाही याबाबत नेमका आकडा माहीत नसल्यामुळे सर्वत्रच गोंधळाची परिस्थिती आहे.  राज्यात गेल्या वर्षात पडलेल्या पावसाचा अभ्यास करून भारतीय हवामान विभागाच्या (पुणे) कार्यालयाने जिल्ह्याचे वर्षभरासाठी  नवे पर्जन्यमान निश्चित केले आहे. सद्या ग्राह्य धरल्या जाणाऱ्या पर्जन्यमानाच्या सरासरीत तब्बल चौदा वर्षानंतर यंदा बदल झाला आहे. त्यामुळे वैजापूर तालुक्यात पावसाच्या सरासरीतही ८५ मि.मी.ची वाढ झाली आहे. यापुढे तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान आता ६२५ मि.मी. एवढे राहणार आहे. या अद्ययावत माहितीबाबत स्थानिक अधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.


प्रकल्प कोरडेच

दरम्यान तालुक्यात अद्याप मुसळधार पाऊस न झाल्याने नारंगी मध्यम प्रकल्पासह भटाणा, कोल्ही, बोरदहेगाव, गाढेपिंपळगाव, सटाणा, बिलोणी , मन्याड साठवण तलाव व  जरुळ या लघू व मध्यम प्रकल्पात अद्याप मृतसाठाच असून हे प्रकल्प मोठया पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.


 'महावेध'ची आकडेवारी धरणार ग्राह्य 

 १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाची दैनंदिन आकडेवारी ही महसूल मंडळ स्तरावर बसविण्यात आलेल्या पर्जन्यमापक यंत्राद्वारे मोजून जिल्हाधिकारी कार्यालयास कळविली जात होती. परंतु पर्जन्यमापक यंत्राच्या झोळझाळ आकडेवारीमुळे मागील बऱ्याच दिवसांपासून तालुक्यातील महसूल मंडळात पडणाऱ्या पावसाच्या आकडेवारीत मोठा संभ्रम निर्माण होत असे. परंतु आता स्वयंचलित महावेध प्रणालीतील आकडेवारीमुळे ही अडचण दूर होणार असल्याचे महसूल विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. 


बारा महसूल मंडळात आॅगस्ट महिन्यात झालेला पाऊस असा :

 वैजापूर : १७९ मिलिमीटर, शिऊर : २२.०३ मिलिमीटर, खंडाळा : १७.०४, लोणी खुर्द : २७.०६ , घायगाव : २८.०७,  गारज : ३३.०९, लाडगाव: १८.००, नागमठाण : २१.०७, महालगाव : ५१.०३, लासूरगाव : ३५.०९,  बाबतारा : १८.०४,  बोरसर : ३७.०६

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top