शाळेला शिक्षक द्या; पालकांची मागणी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संबंधित विभागास वारंवार निवेदने देऊनही दखल न घेतल्याने वैजापूर तालुक्यातील जानेफळ येथील संतप्त ग्रामस्थांनी शाळेला अखेर कुलूप ठोकले.
वैजापूर तालुक्यातील जानेफळ येथील शाळेत शिक्षकांचा वानवा असल्यामुळे ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. |
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील जानेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत यंदा एकूण २७४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून या शाळेतील मुख्याध्यापक पद रिक्त आहे. याशिवाय शाळेत नियुक्त करण्यात आलेले शिक्षक रईस शेख हे वैजापूर तहसील कार्यालयात प्रतिनियुक्तीवर आहेत तर दुसरे शिक्षक सचिन बडे हे बिनपगारी रजेवर आहेत. या सर्व बाबींमुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
दरम्यान शिक्षक रईस शेख यांची प्रतिनियुक्ती रद्द करावी व सचिन बडे यांच्या ऐवजी दुसऱ्या शिक्षकाची व्यवस्था करून रिक्त असलेल्या मुख्याध्यापक पदाची जागा भरावी. अशी मागणी निवेदनाद्वारे पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्याकडे केली होती. असे न झाल्यास येत्या दोन दिवसांत शाळेला टाळे ठोकू असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला होता. निवेदनावर गोकुळ जगदाळे, बाबासाहेब जगदाळे, उज्ज्वला जेजुरकर, असलम शेख, सुरेश जगदाळे, अब्दुल सय्यद, अन्वर शेख आदींच्या सह्या आहेत. दरम्यान निवेदन देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी ६ आॅगस्ट रोजी शाळेला कुलूप ठोकले.