Aditya Thackeray | राज्य सरकारवर घणाघात; काय म्हणाले आदित्य ठाकरे बघा ! माजी आ. चिकटगावकरांच्या अनुपस्थितीने तर्कवितर्क !

0

 महायुतीच्या काळात राज्यात अराजकता 


राज्यात दंगलीसह बलात्काराच्या घटना वाढून अराजकता निर्माण झाली आहे. महायुती सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. येत्या काळात या अपयशी सरकारला जागा दाखवून द्या. असे आवाहन सेनेचे (उबाठा) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वैजापूर येथे केले.


वैजापूर येथील महाराष्ट्र स्वाभिमान सभेत बोलताना आदित्य ठाकरे.

वैजापूर शहरातील लम्क्षीनारायण लाॅनमध्ये २६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर देखील मी येथे आलो. यापूर्वी देखील आपली लढाई सोपी नव्हती. सर्व काही सत्ताधाऱ्यांच्या हातात होते. आपली लढाई लोकशाहीसाठी आहे. ४०० पार म्हणणारे, संविधान बदलण्यासाठी तयार असलेल्यांंना आपण सर्वांनी दिलेल्या लढ्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करायला आलो आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणु‌कीनंतर आमच्या दोन वर्षांच्या काळात महाराष्ट्र मॉडेलचे सर्वत्र कौतुक झाले. परंतु आता सत्ताधाऱ्यांचे  सर्व लक्ष कॉन्ट्रॅक्टरांकडे आहे. शेतमालाला भाव नाही,  सर्वत्र महागाई वाढली आहे . 


मागील अडीच वर्षात राज्याची परिस्थिती अगदी वाईट आहे. राज्याचे कृषी मंत्री तुमच्या तालुक्यात कधी आले का ?  नुसते पंचनामे करून आम्ही जनतेला शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही तर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. सध्या राज्यातील शेतकरी त्रस्त झाले आहे. राज्यात विधानसभा निवडणूक कधी लागतील सांगता येत नाही. कारण निवडणूक आयोगाला  भाजपकडून अद्याप परवानगी मिळाली नाही. कधी निवडणूक , कधी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लावली. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही बंदी उठवली. दरम्यान लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना जनतेने दाखवून दिले. 


या सरकारने तरुणांना रोजगाराची कोणतीही संधी उपलब्ध करुन दिली नाही. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला. या कामातही देखील मोठा भ्रष्टाचार झाला आहे.  २०२० मध्ये आम्ही शक्ती कायदा आणला. परंतु त्यावेळी राज्यपालांनी त्यावर सही केली नाही. आता हे सरकार महिलांऐवजी बलात्काऱ्यांचे रक्षण करीत आहेत. यावेळी विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, संजय निकम, मनाजी मिसाळ, अविनाश गलांडे, देविदास वाणी, सचिन वाणी, संकेत वाणी, आदी उपस्थित होते.


चिकटगावकरांची अनुपस्थिती अन् तर्कवितर्कांना उधाण!

दरम्यान आदित्य ठाकरेंच्या सभेस माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांची अनुपस्थिती असल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण समजू शकले नसले तरी ठाकरे येण्याच्या पार्श्वभूमीवर शहरात झळकलेल्या बहुतांश डिजिटल फलकावरून त्यांचे छायाचित्र हद्दपार झाल्याचे दिसले. या डिजिटल फलकावरून स्थानिक उबाठा शिवसेनेतील गटबाजी झाकून राहिली नाही. तसेच चिकटगावकर समर्थक व कार्यकर्त्यांनीही पाठ फिरविल्याचे दिसून आले. त्यामुळे उबाठामध्ये 'दुभंग' दिसून आला. चिकटगावकरांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


'आम्ही चिकटगावकर समर्थक'

दरम्यान या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश भाऊसाहेब पाटील चिकटगावकर समर्थक कार्यकर्त्यांनी ' आम्ही भाऊसाहेब पाटील चिकटगावकर समर्थक असे 'व्हाॅटस्अॅप स्टेट्स' ठेऊन चिकटगावरांना समर्थन दिले. एकंदरीतच या गटबाजीमुळे तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top