चिकटगावकरांची होतेय 'घुसमट'
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या वैजापूर येथील कार्यक्रमास माजी आमदारांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावणारी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक अन् राजकीय महत्त्वाकांक्षा पाहता सर्वच इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहे. 'करा किंवा मरा' नीतीचा अवलंब करून उमेदवारी मिळवायाचीच असा चंग इच्छुकांनी बांधल्याने राजकारण ढवळून निघाले आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी वैजापूर येथे महाराष्ट्र स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाकडे उबाठा सेनेचे नेते माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. त्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले. चिकटगावकरांची अनुपस्थिती खूप काही सांगून जाते. त्यांनी या विषयावर कुठेही 'खदखद' व्यक्त केली नसली तरी त्यांची 'वादळा'पूर्वीची ही शांतता अधिक 'बोलकी' आहे.
गेल्या काही दिवसांपासून स्थानिक उबाठा शिवसेनेतील 'रस्सीखेच' पाहता चिकटगावकरांनी अलिप्तता घेतल्याचे दिसून येते. आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांची ना कोणत्या बैठकीला उपस्थिती होती ना कार्यक्रमाला. एवढेच नव्हे तर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनीही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. साधारणतः दोन वर्षांपूर्वी चिकटगावकरांनी उबाठा सेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक सेनेला मोठे 'बळ' मिळाले. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. चिकटगावकर पक्षात असले तरी त्यांना सुरवातीपासूनच 'छुपा' विरोध पहिल्यापासूनच सुरू होता. परंतु ही बाब फारशी चव्हाट्यावर आली नाही. परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते उघड झाले.
या कार्यक्रमाच्या अनुपस्थितीचे दुसरे एक कारणही समोर येऊ लागले. एका स्थानिक 'दबंग' भाजप नेत्यांच्या उबाठा सेनेतील प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या प्रवेशसोहळ्यासह उमेदवारीही त्यानांच 'बहाल' केली जाणार असल्याची चर्चा झडू लागली. या नेत्याने विधानसभा कोणत्याही परिस्थितीत लढवायचीच. अशी 'भीष्म प्रतिज्ञाच' केलेली आहे. हा प्रवेशसोहळा होणार की नाही? हा प्रश्न सध्या अनुत्तरित असला तरी या नेत्याच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक उबाठा सेनेत 'चलबिचल' सुरू झाली आहे. चिकटगावकरांनीही विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात 'शड्डू' ठोकण्याचा हेतूनेच त्यांचे काम सुरू आहे. नाही म्हणायला स्वकियांकडून त्यांना विरोध होणार असे गृहीत धरून तो विरोध मोडीत काढण्याची 'धम्मक' नक्कीच त्यांच्यात आहे.
परंतु दबंग नेत्याचा प्रवेश उबाठात होऊन आपल्याला डावलण्याची भीतीही चिकटगावकरांना असल्याचेही बोलले जात आहे. परिणामी चिकटगावकरांनी 'मशाल'पासून अलिप्ततेचे धोरण घेतल्याचेही ऐकिवात येत आहे. भाजपचे 'कमळ' सोडून दबंग नेत्याचा 'उबाठा' प्रवेश अन् चिकटगावकरांची झालेली 'घुसमट' पाहता येत्या काही दिवसांत वैजापूर तालुक्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. विधानसभा निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार असल्या तरी त्यापूर्वीच तालुक्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता आहे. हेही तितकेच खरे आहे. तोपर्यंत मात्र वेट अँड वाॅच करावे लागणार आहे.
चिकटगावकरांबात जिज्ञासा!
ठाकरेंच्या कार्यक्रमातील चिकटगावकरांची अनुपस्थिती खूप 'बोलकी' आहे. याबाबत स्थानिक उबाठात उघड कुणी बोलायला तयार नसले तरी कुणीही इन्कारही करीत नाही. येत्या काळात चिकटगावकरांची भूमिका काय असणार आहे? हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ते काय भूमिका घेतात? याकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागून आहे.