Fraud | आमिष: 'त्या' गुरूने घातला 'त्याला' लाखोंचा गंडा; म्हणे रकमेच्या दुप्पट सोने देतो

0

वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

 

'दिलेल्या रकमेच्या दुप्पट किंमतीचे सोने देतो' असे आमिष दाखवून बाप-लेकाने तरुणाला अकरा लाख ८५ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



               नरेंद्र दत्तात्रय मुळे उर्फ नलूगुरू व अजिंक्य नरेंद्र मुळे (रा.मुळे गल्ली वैजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघा भामट्या बाप-लेकांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण रामधन पवार हे शहरातील हॉटेल व्यावसायिक असून ते  बजरंग चौकात रहिवासास आहेत. ते नरेंद्र मुळे उर्फ नलू गुरू व त्याचा मुलगा अजिंक्य या दोघांना चांगल्या प्रकारे ओळखतात. दरम्यान काही लोकांनी नलू गुरूकडे पैसे दिल्यानंतर त्याने त्यांना दुप्पट किंमतीचे सोने दिल्याचे पवार यांना समजले. ऑगस्ट २०२२ मध्ये भूषण यांची नलुशी भेट झाली. या भेटीदरम्यान 'माझ्याकडे दुबईवरून सोने येते, मला जर पैसे दिले तर सहा महिन्यांच्या आत दुप्पट  किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमचे सोने देईल. त्या सोन्यातील तुमच्या रक्कमेची दुप्पट रक्कम काढून उर्वरीत रक्कम मला परत करावी लागेल' अशी थाप त्याने भूषण यांना मारली. 


यानंतर एक दिवशी नलू मुळे हा भूषण पवार यांच्या घरी आला व त्याने 'पैसा डबल' असे आमिष दाखवून ४ लाख रुपये घेतले. याशिवाय 'तुम्ही आणखीन पैसे गुंतवा म्हणजे जास्त फायदा होईल' असे आमिष दाखवले. यामुळे सप्टेंबर २०२२ मध्ये भूषण याने नलुशी संपर्क साधला परंतु मी बाहेर आहे माझ्या मुलाकडे पैसे देऊन टाका. असे त्याने सांगितले. त्यामुळे भूषण यांनी अजिंक्य  याच्याकडे ४ लाख रुपये नेऊन दिले. यानंतर सहा महिने उलटून देखील परतावा न मिळाल्याने पवार यांनी नलुशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची भेट झाली नाही. त्यानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये वैजापुर येथील संदिप हगवणे यांनी भूषण यांची नाशिक येथे नलुशी भेट घडवून आणली. 


भेटी दरम्यान नलूने पुन्हा एकदा भूषण यांना  'दिलेल्या पैशाच्या दुप्पट किंमतीचे सोने देतो'  अशी थाप मारून २ सप्टेंबर २०२३ ते ७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत एनएफटी व फोन-पेच्या माध्यमातून तीन लाख ८५ हजार रुपये  घेतले. भूषण यांनी असे  एकूण ११ लाख ८५ हजार रुपये त्याला दिले. परंतु त्यांना परतवा मिळाला नाही. याशिवाय नलु मुळे याने वैजापूर येथीलच भारती भीमराज गोरे या महिलेकडून देखील ७ लाख ३० हजार रुपये घेऊन परत न केल्याचे पवार यांना समजले. याप्रकरणी भूषण पवार (रा. वैजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नलुगुरू नेहमीच वादग्रस्त 

शहरातील नलुगुरू हा नेहमीच वादग्रस्त राहीलेला आहे. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध फसवणुकीसह वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. एवढे गुन्हे दाखल असतानाही त्याचा हा फसवणुकीचा गोरखधंदा सुरूच आहे. एकेकाळी त्याचे मोठमोठे कांड बाहेर आलेले आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top