शहरातील भर चौकात बिघाड
राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बस पूर्णपणे निकामी झाल्याचे दिसून येत आहे. याचा अनुभव नाशिक जिल्ह्यातील बसवंत पिंपळगाव आगाराच्या बसमध्ये प्रवाशांना आला. वैजापूर शहरातील ऐन गजबजलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात ही बस बंद पडली. त्यामुळे रहदारी ठप्प झाली होती. या वेळी वाहनधारकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले.शेवटी ट्रॅक्टरने धक्का देऊन बस रवाना करण्यात आली.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा बिघाड झाल्याने तिला ट्रॅक्टरने 'धक्क' देण्याची नामुष्की ओढवली. |
संभाजीनगर येथून प्रवासी घेऊन बस नाशिक येथे जात होती . दुपारी २ वाजेच्या सुमारास ही बस वैजापूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आली.तेथे प्रवासी उतरल्यानंतर बस सुरू होईना. गाडीत बिघाड झाल्यामुळे ही गाडी जागेवरच ठप्प झाली. रहदारीच्या चौकात गाडी उभी राहिल्याने वाहतूक विस्कळित झाली. काही प्रवासी खाली उतरून धक्का दिला. मात्र बस मागेही होईना अन् पुढेही जाईना. त्यामुळे या बसचा चालक व वाहकाला घाम फोडला. शेवटी रस्त्यावरून जात असलेल्या एका ट्रॅक्टरने धक्का देऊन बस सुरू करण्यात आली. प्रवासी सेवेचे ब्रीद घेऊन निघालेली बस गतीमान सरकारचा दावा करणाऱ्या सरकारच्या या अशा बसेसमुळे प्रवाशांना असा त्रास सहन करावा लागत असल्याने नागरीकांमध्ये ही बस चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.
अनेक बस तर निकामी झाल्या आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची संभावना आहे. गाड्यांची अवस्था खराब झाली आहे. जवळपास ८० टक्के जुन्या बस रस्त्यावर धावत आहेत. गळक्या बसेस,तुटलेल्या खिडक्या व खुर्च्या, पत्र्याचे ठिगळे लावलेल्या बस सर्वत्र धावत असल्याने या बस अपघाताला निमंत्रण देत आहे. आगारातून निघाल्यावर या बस मोठ्या प्रमाणावर बंद पडत आहेत. बसला रिमोल्ड टायर वापरली जात आहेत. बरेच टायर गुळगुळीत झाले आहेत. काहींच्या तर तारा दिसत आहेत.त्यातच चालक व वाहक हे मनमानीपणे वागत आहेत.अनेक ठिकाणी बस उभीच करत नसल्याने महिला , ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.त्यामुळे नागरिकांमधून राज्य परिवहन महामंडळाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.