काका - पुतणे फरार
एक दिवसाचा ब्युटी पार्लरच्या कोर्सच्या बहाण्याने एका अल्पवयीन १७ वर्षीय मुलीला पुण्यातील लाॅजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी ब्युटी पार्लरच्या संचालिकेसह तिघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात ब्युटी पार्लरच्या संचालिकेने मध्यस्थी करून तिला पुण्याला नेले. संचालिकेला पोलिसांनी तिला अटक केली असून अन्य दोघेजण फरार आहेत.
विजय साईनाथ राऊत (२३), सुरेश साहेबराव राऊत ( दोघे रा.जरुळ) व प्रज्ञा केशव चव्हाण ( ३३ रा.जीवनगंगा वसाहत, वैजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांंची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील पीडित अल्पवयीन मुलगी ही वैजापूर तालुक्यातील जरुळ येथील रहिवासी असून ती आघुर येथील एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दरम्यान पाच महिन्यांंपूर्वी तिचे जरुळ गावातीलच विजय राऊत या तरुणासोबत मैत्री जमली. त्यामुळे विजय व या मुलीचे फोनवर बोलणे सुरू झाले. यादरम्यान त्याने मुलीचे छायाचित्रे काढली.
हा सर्व प्रकार मुलीच्या आईवडिलांना समजला. त्यानंतर त्यांनी मुलीला समजावून सांगितल्यानंतर मुलीने विजयसोबत संभाषण करणे सोडले. परंतु मुलीची इच्छा नसताना देखील विजय हा तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करीत होता. त्यानंतर मुलीच्या आईवडिलांसह अन्य नातलगांनी विजयला समजावून सांगितले.परंतु विजय राऊत याच्या वागण्यात काही बदल झाला नव्हता. तो नेहमी पीडित मुलीच्या घराजवळ येऊन तिच्याकडे एकटक बघत असे. याशिवाय तो तिच्या वडिलांच्या दुकानासमोर येऊन ' तू माझ्यासोबत पळून चल, नाहीतर तू ज्या मुलासोबत लग्न करशील त्याला मी मारून टाकीन.' अशी धमकी देत.
'ती' प्रज्ञाच्या मोबाईलवरून बोलत होती
दरम्यान मागील चार महिन्यांपासून पीडित मुलीने वैजापूर शहरातील स्टेशन रस्त्यावरील आत्मजा मेकओव्हर जीवनगंगा वसाहतीमधील शॉपिंग क्रमांक ०६ कॉम्प्लेक्समध्ये ब्युटी पार्लरचा कोर्स करीत होती. मुलीकडे मोबाईल नसल्याने ती मागील महिन्याभरापासून ब्युटी पार्लरची संचालिका प्रज्ञा केशव चव्हाण हिच्या मोबाईलवरून विजय राऊतशी संपर्क साधून बोलत होती. पीडित अल्पवयीन असल्याचे प्रज्ञा केशव चव्हाण हिला माहित होते. तसेच पीडित व त्याचे प्रेमसंबंध असल्याबाबत प्रज्ञा हिला माहित होते. परंतु त्यांची प्रत्यक्ष भेट होत नव्हती. म्हणून विजय व प्रज्ञा चव्हाण यांनी पुणे येथे जाण्याचे नियोजन केले.
दर्शनाच्या बहाण्याने प्रज्ञा गेली निघून
विजय व प्रज्ञा चव्हाण यांनी मुलीला सांगितल्याप्रमाणे तिने घरी 'पुणे येथे एका दिवसाचा ब्युटी पार्लरचा कोर्स आहे' असे सांगितले. यानंतर प्रज्ञा व विजय यांनी ०३ जुलै रोजी रात्री मुलीला पुण्याला घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता ते सर्वजण तिथे पोहचले. तिथे पोहोचताच एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबले. दरम्यान प्रज्ञाने 'मी जवळच उमेश पप्पा यांचे दर्शन घेवून येते' असे माणून तेथून निघून गेली तर विजयने पीडितेला ०७ ते ०८ किलोमीटर अंतरावर असलेल्या लॉजवर घेवून गेला. तिथे त्याने मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्याने मुलीचे आक्षेपार्ह छायाचित्रे देखील काढली. त्यानंतर त्याने मुलीला एक मोबाईल फोन देखील घेऊन दिला.
मोबाईलमुळे फुटले बिंग
५ जुलै रोजी ते सर्वजण घरी परतले. यानंतर मुलगी विजयशी फोनवर बोलू लागली. ही बाब तिच्या घरच्यांना समजली. नंतर त्यांनी तिचा फोन घेऊन टाकला व तिच्या मामाच्या घरी पाठवले. विजय व त्याचा काका सुरेश राऊत यांनी तिच्या मामाच्या फोनवर संपर्क करून 'मुलीचे फोटो व्हायरल करू तिला पळवून घेऊन जाऊ' अशी धमकी दिली. दरम्यान याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पोक्सो ) वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास फौजदार प्रवीण पाटील करीत आहेत.
हर्सूल कारागृहात रवानगी
दरम्यान विजय राऊतसह त्याचा चुलता सुरेश राऊत हे दोघे फरार असून पोलिसांनी प्रज्ञा चव्हाण हिला अटक केली आहे. तिची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
छाया स्त्रोत - गुगल