महाराजांचे आक्षेपार्ह वक्तव्य
एका समुदायाच्या धर्म संस्थापकाबाबत Religious Founder) कथित आक्षेपार्ह विधान (Controversial statement) केल्याच्या आरोपावरून वैजापूर शहरात मोठ्या जमावाने एकत्र येऊन घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. दरम्यान या घटनेमुळे वैजापूर शहरासह ( Vaijapur City) तालुक्याच्या ग्रामीण भागात पडसाद उमटून तणाव निर्माण झाला. काही ठिकाणी दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे. या घटनेमुळे शहरात दंगलसदृश वातावरण झाले होते. परंतु पोलिसांसह प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतल्याने परिस्थिती आटोक्यात आली. या पार्श्वभूमीवर शहरात तणावपूर्ण शांतता (Tence Sailent) असून सध्या सराला बेटावर (Sarala Bet) मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.याप्रकरणी सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात (Vaijapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैजापूर शहरात सध्या असा जंबो पोलिस बंदोबस्त तैनात आहे. |
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पांचाळे येथे सध्या गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताह दरम्यान सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी महंमद पैगंबरांविषयी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. परिणामी १५ आॅगस्ट रोजी रात्री ८ वाजता वैजापूर शहरातील एका समुदायचा साधारणतः २००० चा मोठा जमाव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमून घोषणाबाजी केल्याने नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गासह वैजापूर - गंगापूर राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. साधारणतः तीन तास समुदायाने ठिय्या दिल्याने शहरात तणाव निर्माण झाला. यावेळी टायर जाळून घटनेला हिंसक वळण देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. त्याचवेळी दुसऱ्या एका ५०० ते ६०० जणांच्या समुदायाने याच परिसरात घोषणाबाजी सुरू केल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. दोन्हीही समुदाय एकमेकांवर चालून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत, सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांनी वेळीच समुदायाला आवरल्याने पुढील अनर्थ टळला.
वादग्रस्त वक्तव्यानंतर वैजापूर शहरात मोठा जमाव जमा होऊन घोषणाबाजी केली. |
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर येथून दंगाकाबू पथकासह राज्य राखीव दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या. रात्री उशिराने पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी वैजापूर येथे येऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले. तत्पूर्वी उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन होते. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील येवलासह वैजापूर तालुक्यातील खंडाळा व गंगापूर येथेही याच घटनेच्या पार्श्वभूमीवर तणाव निर्माण झाला होता. तसेच याच घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, शिर्डी येथेही एका समुदायाने आंदोलने केली.याप्रकरणी सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वैजापूर पोलिस ठाण्यात रात्री तीन वाजेपर्यंत पोलिस व महसूल अधिकाऱ्यांचा खल सुरू होता.
जमावबंदीचे आदेश लागू
या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी १९ आॅगस्टपर्यंत शहरासह तालुक्यात जमावबंदी आदेश लागू केले असून पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र फिरण्यास मनाई केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सराला बेटावर जंबो पोलिस बंदोबस्त
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सराला बेटावर जंबो पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सराला बेट अहमदनगर जिल्ह्यातील पोलिसांचा तगडा पोलिस बंदोबस्त आहे.
SRP तळ ठोकून
१५ आॅगस्ट रोजी रात्री हे प्रकरण झाल्यानंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे १६ आॅगस्ट रोजी सकाळपासूनच राज्य राखीव दलाच्या ९० जवानांसह पाच अधिकारी, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन होते. शुक्रवारी सकाळी बहुतांश परिस्थिती पूर्वपदावर येऊन व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले होते.
प्रशासनाकडून शांततेचे आवाहन
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. कुणीही समाज माध्यमांंवर प्रक्षोभक संदेश फॉरवर्ड करू नये. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.